Mohol Chikhli Newborn Baby found
पोखरापूर : मोहोळ तालुक्यातील चिखली गावात बुधवारी पुरुष जातीचे एक अर्भक अडगळीच्या ठिकाणी कचऱ्याच्या ढिगार्यात सापडल्यामुळे खळबळ उडाली आहे. पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने तात्काळ त्याला मोहोळ येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी पाठवले असून सध्या तरी अर्भकाची प्रकृती स्थिर असल्याचे पोलीस प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.
याबाबत अधिक माहिती अशी की मोहोळ तालुक्यातील चिखली गावात का किराणा दुकानाच्या जवळील बोळात अडगळीच्या ठिकाणी कचऱ्याच्या ढिगार्यात एका कपड्यांमध्ये गुंडाळलेल्या अवस्थेत एक पुरुष जातीचे अर्भक असल्याचे नागरिकांना बुधवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास दिसले. त्यांनी तात्काळ मोहोळ पोलीस ठाण्याची संपर्क करत याबाबतची माहिती दिली. पोलीस कर्मचारी गावात दाखल झाले असता त्यांना सदरचे अर्भक कचऱ्याच्या ढिगार्यात दिसले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने तात्काळ त्याला मोहोळ येथील बालरोग तज्ञ डॉक्टर मस्के मॅडम यांच्या रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले. प्रथमदर्शी त्या अर्भकाला किरकोळ जखमा असल्याने डॉक्टरांनी तात्काळ उपचार केल्याने सध्या तरी त्या अर्बकाची प्रकृती स्थिर असल्याचे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले.
चिखली सारख्या छोट्याशा गावात अशा पद्धतीने चऱ्याच्या ढिगार्यात अर्भक आढळल्याने गावात एकच खळबळ उडाली त्या ठिकाणी बघ्यांची गर्दी झाली होती. मोहोळ पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ त्या ठिकाणी धाव घेत त्या अर्भकाला लवकरात लवकर उपचार मिळण्यासाठी प्रयत्न केले. याप्रकरणी अद्याप पर्यंत मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल नव्हता. गावातून आम्हाला अर्भक असल्याबाबत फोन आल्याने तात्काळ त्या ठिकाणी कर्मचारी पाठवून त्या अर्भकाचा जीव वाचविण्यासाठी रुग्णालयात पाठवले आहे.
मोहोळ येथील खाजगी रुग्णालयात अर्भकावर उपचार सुरू आहेत. प्रकृती स्थिर आहे. यासंदर्भात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अर्भकास टाकून देणाऱ्या व्यक्तीचा शोध घेऊन त्यास अटक करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.- हेमंत शेडगे, पोलीस निरीक्षक, मोहोळ