मोडनिंब (ता.माढा) शहरात माढ्याचे तहसीलदार संजय भोसले यांच्या अध्यक्षतेखाली महापुरुषांच्या पुतळ्या संदर्भात बैठक झाली Pudhari
सोलापूर

Statue Dispute Solapur | मोडनिंब येथील महापुरुषांच्या पुतळ्यांबाबत अखेर ग्रामस्थ - प्रशासनात सकारात्मक तोडगा

प्रशासनाच्या विनंतीला मान देत ग्रामस्थांचा स्वखुशीने दोन्ही पुतळे काढण्याचा निर्णय

पुढारी वृत्तसेवा

Modnimb Gram Panchayat Statue Dispute

मोडनिंब : मोडनिंब (ता. माढा) येथील ग्रामपंचायत समोर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज व डॉ.बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या पुतळ्यांबाबत अखेर ग्रामस्थ व प्रशासन यांच्यात सकारात्मक तोडगा निघाला आहे. प्रशासनाच्या विनंतीला मान देत ग्रामस्थांनी स्वखुशीने सन्मानपूर्वक हे दोन्ही पुतळे काढण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला.

सोलापूर जिल्ह्यातील मोडनिंब (ता.माढा) शहरात गुरूवारी (दि.९) माढ्याचे तहसीलदार संजय भोसले यांच्या अध्यक्षतेखाली महापुरुषांच्या पुतळ्या संदर्भात जिल्हाधिकारी सोलापूर एस.कार्तिकेयन यांच्या आदेशावरून शांतता कमिटीची बैठक घेण्यात आली. यावेळी टेंभूर्णी पोलीस ठाण्याचे प्रभारी राहुल आत्राम, गटविकास अधिकारी महेश सुळ, पोलीस निरीक्षक महेश ढवन, पोलीस उपनिरीक्षक प्रशांत मदने, ग्रामविकास अधिकारी ज्ञानेश्वर कांबळे आदी प्रशासकीय अधिकारी यावेळी उपस्थित होते.

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आज सायंकाळपर्यंत सन्मानाने काढण्याचे अवाहन प्रशासनाने केले. त्या अवाहनास ग्रामस्थांनी सहमती दर्शवत आज सायंकाळपर्यंत दोन्ही पुतळे सन्मानाने आम्ही स्वतःहून काढून घेण्याचे आश्वासन दिले.

यावेळी दोन्ही पुतळे संदर्भातील अधिकृत मान्यता मिळणेबाबत प्रशासकीय स्तरावर सहकार्य मिळावे अशी विनंती ग्रामस्थांनी व्यक्त केली. जिल्ह्यात मोडनिंब, चिखलठाण, पुनवर, अंकोली, मोहोळ, परिते, भेंड, अंजनगाव, भोसे, चव्हाणवाडी येथे रातोरात पुतळे उभारले गेले आहेत. अंजनगाव येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणी नंतर गावात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता.

मोडनिंब शहरातील ग्रामस्थांनी आज संध्याकाळ पर्यंत दोन्ही पुतळे स्वतःहून सन्मानपूर्वक काढून घेण्याचे आश्वासन दिले. या निर्णयाचे पोलीस प्रशासनाकडून स्वागत करतो. मोडनिंबप्रमाणेच इतर गावांनीही अनुकरण करत व आदर्श घ्यावा.
- राहुल आत्राम, टेंभूर्णी पोलीस ठाण्याचे प्रभारी
मोडनिंब येथे जिल्हाधिकारी सोलापूर यांच्या आदेशावरून शांतता कमिटीची बैठक घेण्यात आली. मोडनिंब ग्रामस्थांनी स्वखुशीने पुतळे काढण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला त्याबद्दल मोडनिंबकरांचे अभिनंदन. याप्रमाणे इतर गावांनीही आदर्श घ्यावा.
- संजय भोसले, तहसीलदार माढा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT