

दक्षिण सोलापूर : होटगी मद्रे हा प्रमुख जिल्हा मार्ग रेल्वे प्रशासनाने पत्रा मारून बंद केल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केल्याचे वृत्त दैनिक पुढारीने प्रसिद्ध केले होते. याची दाखल घेत आमदार सुभाष देशमुख यांनी तत्काळ जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांना बंद केलेल्या रस्ता खुला करण्यात यावा याबाबतचे पत्र दिले आहे.
या रस्त्यासाठी आमदार सुभाष देशमुख यांच्या प्रयत्नातून दोन कोटी 28 लाखाचा निधी प्राप्त झाला होता या माध्यमातून या ठिकाणी रस्त्याचे काम दोन महिन्यापूर्वी पूर्ण करण्यात आले होते. हा रस्ता रेल्वे प्रशासनाने बंद केला होता. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. याबाबत दैनिक पुढारीतून होटगी मद्रे रस्ता रेल्वे प्रशासनाने पत्रा मारून बंद केल्याचे वृत्त प्रकाशित केले होते.
या बातमीची ताबडतोब दखल घेत आमदार सुभाष देशमुख यांनी तात्काळ संबंधित विभागाशी व जबाबदार अधिकाऱ्यांना पत्र व्यवहार करून आपली संवेदनशीलता दाखवून दिली आहे. आमदार सुभाष देशमुख यांच्या या तत्परतेनेमुळे शेतकऱ्यांना न्याय मिळण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. आमदार देशमुख यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नाप्रती संवेदनशीलता दाखविल्याने शेतकऱ्यांनी आमदार देशमुख यांना धन्यवाद दिले आहेत. आ. देशमूख यांनी यासंबंधीच्या पत्राची प्रत मुख्य प्रबंधक मध्य रेल्वे, तहसीलदार दक्षिण सोलापूर आणि उपअभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांना, पाठवली आहे.