Solapur News
सोलापूर: गावातील यात्रेचा उत्साह असतानाच, वडिलांनी पिकांना पाणी देण्यासाठी शेतात पाठवल्याच्या रागातून एका १७ वर्षीय मुलाने टोकाचे पाऊल उचलल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. सोलापूरच्या कासेगाव येथे ही घटना घडली असून, हरिदास अशोक मोरे असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे.
हरिदास हा अकरावीत शिक्षण घेत होता. रविवारी गावात जत्रा असल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण होते. मात्र, कडक उन्हाळ्यामुळे पिके जळू नयेत यासाठी वडिलांनी हरिदासला शेतात जाऊन पिकांना पाणी देण्यास सांगितले. "पिकांना पाणी देऊन मग जत्रेला ये," असे वडिलांनी त्याला बजावले. जत्रेच्या दिवशीच कामाला लावल्यामुळे हरिदास प्रचंड संतापला होता. "जत्रेच्या दिवशी मी शेतात का जाऊ?" अस म्हणत तो रागाच्या भरात मित्राची दुचाकी घेऊन शेतात निघून गेला.
हरिदासचा राग पाहून कुटुंबाला काहीतरी अघटित घडण्याची भीती वाटली. त्यामुळे वडिलांनी मोठ्या भावाला त्याच्या मागोमाग शेतात पाठवले. मात्र, भाऊ शेतात पोहोचेपर्यंत उशीर झाला होता. हरिदासने शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये लोखंडी अँगलला दोरीच्या साहाय्याने गळफास घेतला होता. भावाने तत्काळ दोरी कापून हरिदासला खाली उतरवले आणि वडिलांना सांगितले. त्याला तातडीने सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.