Manoharmama Bhosale Pudhari
सोलापूर

Manohar Bhosale Case | करमाळ्यात मनोहर उर्फ मामा भोसले याच्यासह तिघांविरुद्ध गुन्हा

फसवणूक व जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

Karmala Police Case Against Manohar Mama Bhosale

करमाळा : करमाळा पोलीस ठाण्यात मनोहर उर्फ मामा चंद्रकांत भोसले, नाथबाबा उर्फ विशाल शहाजी तायमारे आणि एका अनोळखी चालकाविरुद्ध बलात्कार, फसवणूक तसेच महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २ जुलै २०२६ रोजी एका ३५ वर्षीय महिलेने करमाळा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. फिर्यादीनुसार, २०२४ मध्ये तिच्या बहिणीच्या पतीला मूत्रपिंडाचा आजार झाल्यानंतर मनोहर उर्फ मामा चंद्रकांत भोसले हे आध्यात्मिक शक्तीच्या माध्यमातून आजार बरा करतात, अशी माहिती मिळाल्याने ती त्यांच्या मठात गेली होती.

फिर्यादीच्या माहितीनुसार, आरोपीने विविध धार्मिक विधी आणि उपचारांच्या नावाखाली वेळोवेळी तिच्याकडून एकूण ९ लाख ६४ हजार रुपये घेतले. मात्र, संबंधित व्यक्तीच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही. याबाबत विचारणा केल्यानंतर आणखी विशेष विधी करण्याची आवश्यकता असल्याचे सांगून पुढील अमावस्येला रात्री उशिरा मठात येण्यास सांगितल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.

त्यानंतर रात्री एका खोलीत नेऊन धार्मिक कारणे सांगत शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी करण्यात आली. तिने नकार दिल्यानंतर पिण्यासाठी दिलेले पाणी प्यायल्यावर ती बेशुद्ध झाली आणि शुद्धीवर आल्यानंतर तिच्यावर अत्याचार झाल्याचे लक्षात आल्याचा आरोपही फिर्यादीने केला आहे.

या फिर्यादीवरून करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ६०७/२०२६ नोंदविण्यात आला असून भारतीय न्याय संहितेतील कलम ६४(१), ३१८(२), ३१८(४), ३५१(२), ३(५) तसेच महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक अधिनियम, २०१३ मधील संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा तपास पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, सहाय्यक पोलीस अधीक्षक अंजना कृष्णा व्ही. एस. आणि पोलीस निरीक्षक रणजीत माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी वळसने करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT