Sant Gajanan Maharaj palkhi Solapur Kamati Khurd
कामती: कामती खुर्द (ता मोहोळ) येथे संत गजानन महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे आज (दि.२) दिमाखात आगमन झाले. शेगाव येथील संत श्री गजानन महाराज पालखीचे शहरात आगमन होताच भाविकांच्या वतीने गण गण गणात बोतेच्या गजरात उत्साहात स्वागत करण्यात आले. संपूर्ण गावात आनंदाचे वातावरण असून ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात पालखीचे स्वागत केले. वाद्यांचा गजर, फुलांची उधळण आणि हरिनामाच्या जयघोषात गावात पालखी दाखल झाली.
या सोहळ्यानिमित्त गावातील महिला, पुरुष, बालक, वृद्ध सर्वजण एकत्र येत भक्तिभावाने सहभागी झाले. कामती खुर्द ग्रामस्थांकडून जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते, ज्यात हजारो भाविकांनी सहभागी होऊन प्रसादाचा लाभ घेतला. श्री गजानन महाराजांच्या पालखी समोर चालणारे घोडे, अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पांढऱ्या शुभ्र पोश ाखात हाती भगव्या पताका घेऊन चालणारे स्वयंसेवक, हाती टाळ घेऊन विठ्ठलाचा तल्लीन झालेले शेकडो वारकरी सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.
कार्यक्रमाचे संयोजन गावकरी मंडळ व संत गजानन भक्त परिवार यांच्या वतीने करण्यात आले होते. गावात यामुळे उत्सवाचे वातावरण निर्माण झाले असून भक्तिभाव, एकोपा आणि श्रध्देचे दर्शन यावेळी घडले.
पालखीतील वारकऱ्यांसाठी यंदा १०० किलो गव्हाच्या ७ हजार चपाती, २५० किलो लाडू आणि ५० किलो अस्सल गावरान ठेचा भोजनासाठी असणार आहे. त्यासाठी गावातील १०५ महिला स्वयंसेवक यांनी रात्रभर जागून भोजन तयार केले आहे.