सोलापूर

सोलापूर : …अन् पुरवठा विभागाने झटकली धूळ

अमृता चौगुले

सोलापूर ,पुढारी वृत्तसेवा : 
कायम तक्रारी आणि चौकशांच्या फेर्‍यात अडकलेली रेशन दुकाने आता चकाचक आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानासह सुरक्षेच्या द़ृष्टीनेही सक्षम राहणार असून यापुढे रेशन दुकानातून दर्जेदार आणि तत्पर सेवा द्या, अशा सूचना पुरवठा विभागाचे विभागीय उपायुक्त त्रिगुण कुलकर्णी यांनी सोलापुरात दिल्या आहेत.

राज्यातील सर्वच रेशन दुकाने, पुरवठा विभागाची कार्यालये, शासकीय गोदामे या ठिकाणी सुस्थितीत असावीत. त्या कार्यालयात वेळेत आणि दर्जेदार सेवा मिळाव्यात, यासाठी राज्यातील सर्व रेशन दुकाने आणि शासकीय कार्यालयांना आयएसओ मानांकन देण्याची महत्त्वाकांक्षी योजना कुलकर्णी यांनी राबविली असून त्यासाठी प्राथमिक तपासणी करण्यासाठी ते मंगळवारी सोलापूर दौर्‍यावर आले होते. यावेळी त्यांनी वर्षानुवर्षे धूळखात पडलेल्या कागदपत्रांची पाहणी केली. आवश्यक कागदपत्रांचे जतन करण्याच्या दृष्टीने सूचना दिल्या आहेत. त्यामुळे वर्षानुवर्षे विविध शासकीय कार्यालयात आणि गोदामात धूळ साचलेल्या फायली झटकण्यात आल्या आहेत. सोलापुरातील अ‍ॅचिव्हर्स हॉल येथे या जुन्या दप्तराची तपासणी करण्यात आली. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी वर्षा लांडगे, सहाय्यक पुरवठा अधिकारी विवेक साळुंखे यांच्यासह कर्मचारी तसेच रेशन दुकानदार प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जिल्ह्यातील रेशन दुकानांना आयएसओ मानांकन मिळणार आहे. पुरवठा विभागाची सर्वसामान्य लोकांच्या जिविताशी नाळ जोडलेली असते. त्यामुळे ही रेशन दुकाने तसेच त्यासाठीची गोडावून अत्याधुनिक तंत्रज्ञाच्या सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने, कामकाजामध्ये पारदर्शकता यावी, पुरवठा यंत्रणेतील भ्रष्टाचार कमी व्हावा, यासाठी पुरवठा विभागाचे आयुक्त त्रिगुण कुलकर्णी यांनी जिल्ह्यातील जवळपास 1,558 रेशन दुकानांना आयएसओ मानांकन देण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरु केले आहेत.त्यासाठीची चेक लिस्ट जिल्ह्यातील रेशन दुकानंदाराना देण्यात आली आहे.त्या अनुषंगाने दुकानांना रंग देणे, फर्निचर करणे, फायर संरक्षणाची यंत्रणा बसविणे, मालाची स्वच्छता आणि सुरक्षा राखणे, अन्न प्रशासनाचा परवाना घेणे, सीसी टीव्ही कॅमेरे बसविणे, वजन काटे वेळच्या वेळी तपासून घेणे यासारख्या सुधारणा करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या आहेत. त्यासाठीची प्राथमिक तयारी काय झाली आहे. जुने आणि महत्त्वाची रेकॉर्ड जतन करणे, कालबाह्य झालेले रेकार्ड बाजूला काढणे या दृष्टीनेही अनेक सूचना यावेळी पुरवठा विभागाला देण्यात आल्या आहेत. त्यामुळे वर्षानुवर्षे या फायलीवर साचलेली धूळ आता झटकण्याचे काम सुरू झाले आहे.

जिल्हा पुरवठा विभाग आणि जिल्ह्यातील शासकीय गोदामांसह रेशन दुकानेही चकाचक दिसणार आहेत. जिल्ह्यातील अनेक रेशन दुकानदारांनी या आयएसओ मानांकन प्रक्रियेत सहभाग घेतला आहे. त्यामुळे बाह्य एजन्सीच्यावतीने संपूर्ण तपासणी झाल्यानंतर अनेक दुकानांना हे मानांकन मिळणार असल्याचे पुरवठा विभागाच्या वतीने जिल्हा पुरवठा अधिकारी वर्षा लांडगे यांनी यावेळी दैनिक 'पुढारी'शी बोलताना सागितले.

हे ही वाचलं का 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT