सोलापूर: पुणे आणि नगर जिल्ह्यांत झालेल्या मुसळधार पावसामुळे उजनी आणि वीर धरणांमधून भीमा नदीच्या पात्रात तब्बल १ लाख ८७ हजार ८५० क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आले आहे. या प्रचंड विसर्गामुळे भीमा नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून, तिर्थक्षेत्र सिध्देश्वर येथील श्री जटाशंकर मंदिरही पाण्यात गेले आहे.
नदीकाठची गावे आणि बंधारे पाण्याखाली
नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाल्याने अनेक कोल्हापूर पद्धतीचे बंधारे पाण्याखाली गेले आहेत. याचा फटका नदीकाठच्या गावांना बसला आहे. पाण्याखाली गेलेल्या बंधाऱ्यांमध्ये उचेठाण, बठाण, माचणूर, अरळी, वडापूर, सिद्धापूर यांचा समावेश आहे
प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
जिल्ह्यात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, नागरिकांनी नदीच्या पाण्याच्या प्रवाहात जाऊ नये, तसेच आपली जनावरे नदीकाठी सोडू नयेत, असे आवाहन भीमा पाटबंधारे विभागाकडून करण्यात आले आहे. प्रशासनाकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.
विशेष म्हणजे, यंदाच्या पावसाळ्यात भीमा नदीला आलेला हा दुसरा मोठा पूर आहे. यापूर्वी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे नदीने धोक्याची पातळी गाठली होती.