

मंगळवेढा : गेल्या दोन आठवड्यापासून सुरू असलेल्या पावसामुळे तालुक्यातील शेतकरी चिंतेत पडले आहेत. येथील शेतकर्यांनी शेतात कांदा, उडीद, मूग पीक मोठ्या प्रमाणात पेरले आहे. ते पीक आता अडचणीत आले आहे. या पावसाने केलेल्या संततधार सरीने शेतकर्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. प्रशासनाने अद्याप पंचनामे करण्याचे आदेश दिले नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
मंगळवेढा तालुक्यातील पूर्व भागातील शेतकर्यांना गेल्यावर्षी खरीप हंगाम उडीद पिकासाठी लाभदायक ठरला होता. त्यामुळे यंदा या भागात मोठ्या प्रमाणात उडीद व मूग पीक पेरण्यात आले होते. परंतु आता पाऊस सुरू असल्याने शेतकरी चिंतेत आहेत. मात्र प्रशासन याकडे लक्ष देत नसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. या पावसाच्या आधारावर शेतकर्यांनी यावर्षी खरिपाच्या पेरण्या लवकर केल्या. तालुक्यात सध्या 40 हजार हेक्टरवर पेरणी झाली असून उडीद 3680 हे., मूग 243 हे., कांदा 3500 हे., बाजरी 7300 हे., मका 11200 हे., तूर 7500 हे., भुईमूग 706 हे., सूर्यफूल 4000 हेक्टर इतक्या क्षेत्रावर पेरणी झाली आहे.
मध्यंतरी पावसाने हुलकावणी दिली. परंतु 4 ऑगस्टपासून मंगळवेढा तालुक्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावली. सततच्या पावसाने उडीद, मूग या पिकाला लागलेल्या शेंगा कुजून गेल्या आहेत. त्यावर काही ठिकाणी कोंब आल्याने ते हाती न लागल्याने ते उपटून फेकावे लागत आहे. त्यामुळे शेतकर्यांना या पिकातून बियाणे, मशागत, मजुरी याचे पैसेसुद्धा मिळणे कठीण झाले आहे.