सोलापूर ः मोटारसायकलवरून आलेल्या एका टोळीने मार्केट यार्डातील कंपनीतून घरी जाणाऱ्या एकास मारहाण करून रोख 25 लाख रुपये लुटले. हा प्रकार दि. 6 जानेवारी रोजी घडला. याबाबत गुरुवारी (दि. 8) गुन्हा दाखल करण्यात आला. लुट करणाऱ्या आठ संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबत माहिती अशी, गजेंद्रसिंह बनुजी चावडा (वय 48, रा. गुजरात, सध्या रा. श्रीराम अपार्टमेंट, जुना पुणे नाका, सोलापूर) हे गुजरात येथील वीर एंटरप्रायझेस या कंपनीत काम करतात. सोलापुरातील मार्केट यार्डात या कंपनीचे कामकाज चालते. चावडा हे सहा जानेवारी रोजी सायंकाळी सहा वाजता कंपनीच्या कामासाठी आणलेली 25 लाखांची रोकड घेऊन मार्केट यार्डातून आपल्या घरी जात होते. कारंबा नाका येथे आल्यानंतर त्यांना तीन मोटारसायकलवरुन आलेल्या इसमांनी अडवले आणि त्यांना मारहाण करीत गाडीवरुन खाली पाडले. त्यातील एकाने चावडा यांच्या हाताला चावा घेतला. या गोंधळात गाडीच्या डिक्कीत ठेवलेली 25 लाखांची रक्कम तसेच कागदपत्रे असलेली बॅग मारहाण करणाऱ्यांन पळवून नेली. याबाबत चावडा यांनी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात धाव घेतली. आठ जानेवारी रोजी याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला. फौजदार चावडी पोलिसांनी यातील आठ संशयीतांना अटक केली असून त्यांच्याकडून दोन लाख रुपयांची रक्कम हस्तगत केली आहे. त्यांना न्यायालयाने आठ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक क्षीरसागर करीत आहेत.