Vairag Elderly Man Death Pudhari
सोलापूर

Solapur News | कंबरदुखीवरील उपचारानंतर अंगावर फोड; वैरागच्या ८० वर्षीय वृद्धाचा मृत्यू

शवविच्छेदन अहवालानंतर नेमके कारण येणार समोर

पुढारी वृत्तसेवा

Vairag Elderly Man Death

वैराग : कंबरदुखीच्या उपचारानंतर अंगावर मोठ्या प्रमाणात फोड आल्याने वैराग येथील ८० वर्षीय वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन आणि फॉरेन्सिक अहवालानंतरच स्पष्ट होणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वैराग येथील प्रसिद्ध मूर्तिकार श्रीधर गवळी (वय ८०) यांना काही दिवसांपासून कंबरदुखीचा त्रास होत होता. उपचारासाठी त्यांनी वैराग येथील एका खासगी डॉक्टरांकडे धाव घेतली. तेथे त्यांना इंजेक्शन देण्यात आले तसेच औषधे घेण्याचा सल्ला देण्यात आला. त्यानंतर त्यांच्या अंगावर मोठ्या प्रमाणात फोड आल्याची आणि असह्य वेदना सुरू झाल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली आहे.

प्रकृती खालावल्याने २२ जून रोजी त्यांना सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असतानाच २४ जून रोजी त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी सोलापूर तालुका पोलिस ठाण्यात प्रारंभी अपमृत्यूची झिरो क्रमांकाने नोंद करण्यात आली. त्यानंतर हे प्रकरण वैराग पोलिस ठाण्याकडे वर्ग करण्यात आले असून, संबंधित तरतुदींनुसार पुढील कार्यवाही सुरू आहे.

या घटनेनंतर वैद्यकीय उपचारांबाबत विविध प्रश्न उपस्थित होत असले, तरी मृत्यूचे कारण अद्याप अधिकृतपणे स्पष्ट झालेले नाही. शवविच्छेदन अहवाल, फॉरेन्सिक तपासणी आणि इतर वैद्यकीय अहवाल प्राप्त झाल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. या प्रकरणाचा तपास वैराग पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अमोल कादबाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कॉन्स्टेबल उमेश कंगले करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT