

सोलापूर : शेतकरी आणि महिला बचत गटांच्या उत्पादनास बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी अक्कलकोट, पंढरपूर, तुळजापूरसह इतर दहा महामार्गांवर ॲग्रो मॉल उभारण्यात येणार आहे. त्या दृष्टीने प्रशासनाकडून तयारी सुरू आहे.
महसूल विभागाच्या उपलब्ध जागांवर हे मॉल उभारले जाणार आहेत. या प्रकल्पासाठी जिल्हा नियोजन समिती निधीचा वापर करण्यात येणार असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा पर्यटन विकास अधिकारी लक्ष्मण कुसेकर यांनी दिली. कृषी उत्पादनांची थेट विक्री, मूल्यवर्धित उत्पादनांना बाजारपेठ आणि महिला बचत गटांच्या उत्पादनांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा या योजनेचा प्रमुख उद्देश आहे.
अग्री मॉलमध्ये शेतकरी उत्पादक कंपन्या, शेतकरी आणि महिला बचत गटांना विक्रीसाठी स्वतंत्र स्टॉल उपलब्ध करून दिले जाणार आहेत. याशिवाय कोल्ड स्टोरेज, पॅकेजिंग, इलेक्ट्रॉनिक वजन काटे, साठवण व्यवस्था, विश्रांती कक्ष, अशा विविध सोयी उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे. त्यामुळे फळे, भाजीपाला, धान्य, कडधान्ये, मसाले, लोणची, पापड आणि इतर प्रक्रिया केलेल्या कृषी उत्पादनांची विक्री अधिक प्रभावीपणे करता येणार आहे.
या मार्गांवर होणार मॉल
जिल्हा प्रशासनाने पहिल्या टप्प्यात सोलापूर, अक्कलकोट, हैदराबाद महामार्ग परिसर, बार्शी, मंगळवेढा, तुळजापूर, मोहोळ, पंढरपूर, करमाळा आणि टेंभुर्णी या दहा ठिकाणी ॲग्री मॉलसाठी जागा निश्चित केल्या आहेत.