टेंभुर्णी: सोलापूर महामार्गावर टेम्पो चालकाला मारहाण करून कांद्याने भरलेली गाडी आणि मोबाईल लंपास करणाऱ्या चार जणांच्या टोळीला टेंभुर्णी पोलिसांनी अवघ्या दोन दिवसांत गजाआड केले आहे. या कारवाईत पोलिसांनी चोरलेला १० लाख ३४ हजार ३५० रुपयांचा संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करण्यात यश मिळवले आहे.
नेमकी घटना काय?
१८ जून रोजी शिवाजी नामदेव नांदे हे आपल्या नवीन महिंद्रा बोलेरो पिकअपमधून कांदा घेऊन जात होते. हायवेवर चार अनोळखी तरुणांनी त्यांना अडवले. "गाडी नीट चालवता येत नाही," असे म्हणत या तरुणांनी शिवाजी नांदे यांना मारहाण केली आणि त्यांचा कांद्याचा टेम्पो, मोबाईल व कागदपत्रे असा एकूण १० लाख ३४ हजार ३५० रुपयांचा ऐवज लुटून पोबारा केला होता. या प्रकरणी टेंभुर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलिसांची चक्र फिरली
घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी अंजना कृष्णा व्ही. एस. आणि पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या होत्या. सहाय्यक पोलीस निरीक्षक संदेश बावकर यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाने तांत्रिक माहितीच्या आधारे तपास सुरू केला. उजनी धरणाजवळच्या चिल्लारीच्या झुडपात लपवलेली कांद्याची पोती पोलिसांना सापडली. त्यानंतर पोलिसांनी भिमानगर, रांझणी, हिंगणगाव, तरटगाव या परिसरात शोध घेऊन तांत्रिक विश्लेषणाद्वारे आरोपींपर्यंत मजल मारली.
हे आहेत अटकेतील आरोपी:
१. प्रणित उर्फ नन्या संजय गायकवाड (वय २१, रा. रांझणी) २. शाहरुख उर्फ श-या राजू शेख (वय २१, रा. भिमानगर) ३. अथर्व उर्फ विकास सोमनाथ खानेवाले (वय १९, रा. इंदापूर) ४. संदेश उर्फ नवा सुभाष भोसले (वय १९, रा. बाभुळगाव) या आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलिसी खाक्या दाखवताच या चौघांनी गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी चोरलेली बोलेरो पिकअप आणि कांदा असा सर्व मुद्देमाल जप्त केला आहे. अवघ्या ४८ तासांत गुन्ह्याचा छडा लावल्याबद्दल टेंभुर्णी पोलीस पथकाचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे. या कामगिरीमध्ये सपोनि संदेश बावकर, पोहेकॉ विलास नलवडे, संदीप गिरमकर, पोकॉ मोहन तळेकर, सुरज मुलाणी, हनुमंत देवकर, समाधान धोत्रे आणि सायबर विभागाचे व्यंकटेश मोरे यांचा समावेश होता.