भोंदू नाना महाराज उर्फ पांडुरंग वीरकर  
सोलापूर

Solapur Crime | सोलापूरातील आणखी एका भोंदू बाबाचा पोलिसांनी उठवला बाजार! जिंवत कासव व सिमेंटचे कासव घेऊन करणार होता अघोरी विधी!

भोंदू नाना महाराज उर्फ पांडुरंग वीरकर यांने घेतली अघोरी विधीसाठी 2 लाखांहून अधिक रक्कम, पाच दिवसांची पोलिस कोठडी, टेंभुर्णी पोलिसांची कारवाई

पुढारी वृत्तसेवा

टेंभुर्णी : -माढा तालुक्यातील भोंदू महाराजांचा टेंभुर्णी पोलिसांनी अखेर बाजार उठविला आहे.आर्थिक अडचणीतून सुटका करण्यासाठी व अघोरी विधीसाठी १७ फेब्रुवारी २०२४ ते ऑगष्ट २०२४ या दरम्यान एका भक्तांकडून वेळोवेळी दोन लाख ३५ हजार रु.घेऊन विश्वासघात करीत फसवणुक केल्याबद्दल दाखल गुन्ह्यात मौजे आढेगाव येथील भोंदू नाना महाराज उर्फ पांडुरंग वीरकर या भोंदू महाराजासह त्याच्या भावाच्या टेंभुर्णी पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.या दोघांना माढा न्यायालयाने पाच दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे.

पांडुरंग उर्फ नाना उर्फ माऊली महाराज बापूराव विरकर (वय-२२ वर्ष) व विकास बापूराव विरकर (वय-२५) दोघे रा.विरकर वस्ती वडोली ता.माढा अशी पोलीस कोठडी सूनावलेल्या भोंदू महाराजाची नावे आहेत. तर निलेश बाळासाहेब भुईटे (वय-३२ वर्षे),रा.लक्ष्मी टाकळी ता.पंढरपूर यांनी फिर्याद दिली आहे.

निलेश भुईटे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की,मी मोबाईलमध्ये फेसबुक पाहत असताना मला फेसबुकवर मौजे आढेगांव (ता.माढा, जि.सोलापूर) येथील नाना विरकर उर्फ गुरू माऊली यांचे मौजे आढेगांव येथील लोकांचे व्हिडीओ दिसुन आले. त्यानंतर मी १७ फेब्रुवारी २०२४ रोजी ११.५० वा.मौजे आढेगांव येथील गुरु माऊली याच्या दरबारामध्ये गेलो.त्या ठिकाणी दोन खोल्या होत्या. मठात गुरू माऊली हा आढेगाव येथील चमत्कारीक पुरुष असून शारीरीक,मानसिक आजार असल्यास तो दैवी शक्तीच्या आधारे बरा करतो व अडचणी सोडवितो असे तो स्वतः लोकांना सांगत होता .दोन खोल्यामध्ये गुरू माऊली भक्तांना त्यांचे भविष्य पाहुन त्यांच्या अडचणीवर उपाय सांगत होता. त्यानंतर माझा नंबर आल्याने मी खोलीमध्ये गेलो.

त्या ठिकाणी भविष्य पहाण्यासाठी महाराजांनी माझे नाव,पत्ता विचारून मला माझ्या पत्नीचे व मुलांची नावे सांगुन माझा पॅनकार्ड नंबर व आधारकार्ड नंबर सांगितला. यामुळे माझा त्यांचेवर विश्वास बसला. त्यांने मला माझी अडचण विचारली असता मी आर्थिक अडचणी मध्ये असल्याचे सांगितले. त्यावेळी त्यांने मला तुम्हाला करणी बाधा व गंभीर पितृदोष आहे असे सांगितले. त्यावर उपाय म्हणून त्यांनी एक जिंवत कासव व एक सिमेंटचे कासव घ्यावे लागेल त्याद्वारे असवा पाऊस पाडता येईल असे सांगितले. त्याने तुमची आर्थिक अडचण दुर होईल. कासवाचा व विधीचा खर्च असा एकूण पाच लाख होईल असे सांगितले.

त्यानुसार त्यांच्यावर माझा विश्वास बसल्याने त्यास फोन पे नंबरवरून २० हजार रूपये.त्यानंतर त्याच्या फोन पे नंबर ९५६१०३६७९० यावर पाठविले व रोख ५० हजार-रू दिले. तसेच रोख ५० हजार रूपये त्यांचा भाऊ विकास विरकर यांस दिले. त्यावेळी त्यांनी मला एक जिंवत कासव व एक सिमेंटचे कासव असे दिले. त्या सोबत मला एक डुक्कराचा दात देवुन तो जवळ ठेव, यामुळे तुझ्यावर कोणतीही करणी बाधा होणार नाही असे सांगितले. तसेच पैशाचा पाऊस पाडतो असे म्हणून काही वस्तू दिल्या.

नव शिव सह्याद्री ऍग्रो फार्म लि. या कंपनीचा भागीदार करतो म्हणून बनावट कागदपत्रे देऊन फसवणूक केली.आणखी जडीबुडी वनस्पती देवुन त्याही जवळ ठेव अपघात होणार नाही असे म्हणुन डुक्कराचा दात व जडीबुटी वनस्पती मला दिली. तूम्ही माझ्या संपर्कात रहा,तुमच्या अडचणी दुर करतो,तुम्ही माझ्याकडे येत जात जा असे म्हणाला. पैसे देऊन सर्व काही करून ही काहीही फरक पडत नसल्याने पैसे परत मागितले असता महाराजाने फिर्यादीस धमकी दिली होती.

या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सागर गायकवाड हे करीत आहेत.

ही कारवाई पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, सहा.पोलीस अधिक्षक करमाळा उपविभाग अंजना कृष्णा मॅडम, यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पोलीस अधिक्षक तथा टेंभुर्णी पो.स्टेशनचे प्रभारी राहुल आत्राम, पोसई सागर गायकवाड, सहा.पो.उपनिरीक्षक विलास रणदिवे, पोहेकॉ संदीप गिरमकर, संतोष पाटेकर, सुरज मुलाणी, संदीप साखरे यांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT