

करमाळा : ठेकेदार, उद्योजक, बडे अधिकारी, राजकारणी, सेलिब्रिटी भक्ताकडून भविष्य बघण्यासाठी अकरा हजार रुपयांपासून लाखो रुपयांची देणगी उकळणाऱ्या भोंदू मनोहरमामा भोसले याने करमाळा तालुक्यातील घोटी येथे तब्बल 27 एकरात आलिशान आश्रम उभारला. हा आश्रम नव्हे आलिशान फार्म हाऊसच असल्याचे दिसून येत आहे.
या आश्रमाच्या बांधकामासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च केला असल्याचे आता समोर आले आहे. मनोहर ऊर्फ मनोहर मामा भोसले यांनी श्री संत बाळूमामाचा अवतार असल्याचे भक्तांना सांगून करमाळा तालुक्यात गेल्या दहा वर्षांपासून उंदरगाव व त्यानंतर घोटी येथे आश्रम चालवला. 2021 मध्ये उंदरगावच्या मठात एका महिलेवरील लैंगिक अत्याचार व फसवणुकीच्या गुन्ह्यात मनोहरमामा भोसले यांच्यावर करमाळा पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर तो तब्बल चार महिने जेलमध्ये होता. बार्शीच्या सत्र न्यायालयातून या प्रकरणात जामीनावर सुटका झाल्यानंतर सहा महिन्याच्या कालावधीतच तालुक्यातील घोटी येथे 27 एकर जागेत आश्रम उभा करून येथे अमावस्या व पौर्णिमेला भक्तांचा दरबार भरवला.
या दरबारास प्रामुख्याने मुंबई, पुण्यातील बडी मंडळी आलिशान गाड्या घेऊन हजेरी लावत असे. व्यापार, व्यवसायात नफा मिळावा, राजकारणात उच्चपद मिळावे यासाठी मनोहरमामाकडे होम हवन, पूजा विधि करून घेत असत यासाठी भोंदू मनोहर लाखो रुपयांचा खर्च घेत असल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या तीन वर्षापासून घोटी येथील आश्रमात प्रत्येक अमावस्येला तब्बल तीन ते साडेतीन हजार भक्त भोंदू मनोहरकडे भविष्य पाहण्यासाठी येत असे. भाविक भक्तांवर आपल्या विद्येची छाप टाकून भोंदू मनोहरने जमविलेल्या कोट्यावधी रुपयातून 27 एकर माळरान असलेल्या खडकाळ जमिनीवर आलिशान आश्रम उभारला.
27 एकराच्या आश्रमा सभोवती संपूर्णत: कंपाउंड वॉल चे बांधकाम करण्यात आलेे असून आश्रमात चार हजार भाविक भक्तांना बसता येईल असा अध्यात्मिक हॉल उभारण्यात आला आहे. तर आश्रमात भोंदू मनोहरमामाच्या निवासाची आलिशान व्यवस्थेसह बाहेरून आलेल्या व्हीव्हीआयपी व आश्रमात सेवा करण्यासाठी आलेल्यांच्या निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. आश्रम परिसरात आंब्याची व नारळाची बाग फुलविली आहे.आश्रमात गावरान गायी, म्हैस व शेळया सुध्दा आहेत. आश्रमात प्रामुख्याने पुणे,सातारा या जिल्ह्यातील भक्त आश्रमात साफसफाईसह बाग सांभाळण्याची कामे करत असल्याची माहीती मिळाली.