करमाळ्यात बोगस डॉक्टरवर छापा Pudhari Photo
सोलापूर

Solapur Bogus Doctor | करमाळ्यात बोगस डॉक्टरवर छापा; सहा दिवसांची पोलीस कोठडी

वैद्यकीय फसवणुकीचा पर्दाफाश; बंगाली डॉक्टरवर पोलिसांची कारवाई

पुढारी वृत्तसेवा

करमाळा : करमाळा तालुक्यातील पुनवर गावात खाजगी दवाखाना चालवणाऱ्या आणि कोणतीही मान्यताप्राप्त वैद्यकीय पदवी नसताना उपचार करणाऱ्या एका बंगाली बोगस डॉक्टरवर पोलिसांनी कारवाई केली आहे. समीर पूर्णा मंडल (वय ४२, रा. बारासाल, पश्चिम बंगाल) असे या अटकेत आलेल्या बनावट डॉक्टरचे नाव असून, त्‍याला अटक करुन करमाळा न्यायालयात हजर केले असता त्याला सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

ही कारवाई ३० जुलै रोजी दुपारी करण्यात आली. करमाळा तालुक्याचे वैद्यकीय अधिकारी महेश्वर भगवान काटकर (वय २७) यांनी या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली होती. मिळालेल्या माहितीनुसार, समीर मंडल हा पुनवर गावात बेकायदेशीरपणे दवाखाना चालवत असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली. त्यानंतर गटविकास अधिकारी डॉ. अमित कदम, समुदाय आरोग्य अधिकारी अक्षय जोरी, पोलिस हवालदार पांडुरंग आरकिले, चालक सागर सोरटे, पंच भागवत चव्हाण आणि डॉ. रवींद्र पुंडे यांच्या पथकाने छापा टाकला.

छाप्यात बनावट रुग्ण पाठवून तपासणी केली असता, समीर मंडल हा प्रत्यक्ष उपचार करत असल्याचे आढळून आले. दवाखान्यात कोणतीही वैद्यकीय पदवी, प्रमाणपत्र किंवा नोंदणी आढळली नाही. मात्र, रुग्ण तपासणीसाठी टेबल, कॉट, इंजेक्शन, गोळ्या, सलाईनच्या बाटल्या आदी साहित्य सापडले. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून सर्व औषधे आणि वैद्यकीय साहित्य जप्त केले.

समीर मंडल याच्याकडे कोणतीही वैध नोंदणी किंवा शैक्षणिक पात्रता नसताना तो वैद्यकीय व्यवसाय करत होता. त्यामुळे त्याच्यावर मेडिकल प्रॅक्टिशनर कायदा १९६१ चे कलम ३३, भारतीय दंड संहिता कलम ३१९(२), ३१८(४) आणि महाराष्ट्र वैद्यकीय अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास हवालदार महेश डोंगरे करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT