

माळशिरस : केळी निर्यातीमध्ये सोलापूर जिल्ह्याचा वाटा सर्वात मोठा आहे. राज्यातून होणार्या निर्यातीत सोलापूरचा वाटा सुमारे 66.43 टक्के आहे. त्यामुळे हवामान, मृदापरीक्षण, केळीच्या विविध जाती, लागवडीचे तंत्रज्ञान, रोग व किडींचे व्यवस्थापन, शिक्षण व प्रशिक्षण यादृष्टीने अभ्यास आणि उपाययोजना करण्यासाठी केळी संशोधन केंद्राची गरज आहे. यासाठी करमाळा तालुक्यात शेळगाव येथे केळी संशोधन केंद्र सुरू करावे, अशी लक्षवेधीद्वारे मागणी आ. रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी विधानपरिषदेत केली.
दरम्यान, राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी राज्य व केंद्र सरकारच्या मदतीने करमाळा तालुक्यात केळी संशोधन केंद्र सुरू करण्यासाठी सकारात्मकता दर्शविली आहे. आ. मोहिते-पाटील म्हणाले की, केळी उत्पादनात आणि निर्यातीत सोलापूर जिल्हा अग्रेसर आहे. खा. धैर्यशील मोहिते-पाटील यांनी केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्याचा केळी निर्यात क्षेत्रात समावेश करून घेतला आहे. गेल्यावर्षी महाराष्ट्रातून 12 लाख 43 हजार 899 मे.टन केळीची निर्यात झाली. यातील सुमारे 8 लाख 26 हजार 322 मे.टन केळी सोलापूर जिल्ह्यातून निर्यात झाली आहे.
राज्यातून होणार्या निर्यातीत सोलापूरचा वाटा मोठा होता. त्यामुळे हवामान, मृदापरीक्षण, केळीच्या विविध जाती, लागवडीचे तंत्रज्ञान, रोग व किडींचे व्यवस्थापन, शिक्षण व प्रशिक्षण यादृष्टीने अभ्यास आणि उपाययोजना करण्यासाठी केळी संशोधन केंद्राची गरज आहे. याठिकाणी कृषी विभागाच्या फळरोपवाटिकेची व महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कोरडवाहू संशोधन केंद्राची एकूण सुमारे 100 एकर जागा उपलब्ध आहे. शेलगाव (वां) ता. करमाळा येथील या जागेवर केळी संशोधन केंद्र स्थापन करण्याबाबतचा प्रस्ताव पाठवण्याचे शासनाने संबंधित विभागाला आदेश देण्यात आले होते. तशा प्रकारचा प्रस्ताव शासनाकडे आला आहे का, यावर शासनाने काय कार्यवाही केली, अशा प्रकारची लक्षवेधी आ. मोहिते-पाटील यांनी सभागृहात उपस्थित केली. जागतिक बाजारपेठेसाठी एकाच ब्रँडने व्यवस्था उभी करणे गरजेचे आहे.
निर्यातीच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्रातून जागतिक दर्जाचा केळीचा ब्रँड तयार होण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणीही केली. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे म्हणाले, जळगाव व नांदेड येथे केळी संशोधन केंद्र आहे. परंतु या जिल्ह्यातून केळीची निर्यात कमी आहे. केळी संशोधन केंद्रास आवश्यक असणारी जागा शेलगाव येथे उपलब्ध आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विश्वासात घेऊन केंद्र व राज्य सरकारच्या मदतीने केळी संशोधन केंद्र सुरू करण्याबाबत योग्य ती कारवाई केली जाईल, असे ते म्हणाले.