सोलापूर : शिवसेना शिंदे सेनेने राष्ट्रवादी अजित पवार गटासोबत युती करण्याचा निर्णय जाहीर केल्याने आता भाजपला एकला चलोचा मार्ग मोकळा झाला आहे; परंतु आयारामामुळे निष्ठावंत कार्यकर्त्यांनी बंडाचा झेंडा कायम ठेवला आहे. याबाबतचा पक्षश्रेष्ठी कोणता तोडगा काढतात यावर भाजपचे राजकीय गणित अवलंबून राहणार आहे. दरम्यान, इच्छुकांना उमेदवारी यादीची प्रतीक्षा आहे.
आ. कोठे हे स्वबळासाठी आग्रही होते. सन 2017 च्या सार्वत्रिक महापालिका निवडणुकीमध्ये भाजपने स्वबळावर निवडणूक लढवून 49 नगरसेवक निवडून आणले होते. यंदा मात्र भाजपच्या विजयकुमार देशमुख, सुभाष देशमुख, देवेंद्र कोठे या तिन्ही आमदारांमध्ये आणि शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांच्यात समन्वय नसल्याचे चित्र असून काँग्रेसचे माजी आ. दिलीप माने यांच्यासह अनेक माजी नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश झाल्याने इच्छुकांची संख्या वाढली आहे.
भाजप आणि शिंदे सेना युती व्हावी याबाबत दोन वेळा बैठका झाल्या होत्या. पालकमंत्री जयकुमार गोरे आणि शिंदे सेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख संजय कदम यांच्यात बैठक झाली. सुरुवातीला 50 टक्के जागेवर शिंदे सेनेने हक्क सांगितला. त्यानंतर 30 जागेचा प्रस्ताव दिला; परंतु भाजपकडून प्रस्तावाबाबत निर्णय न झाल्याने शिंदे सेनेने राष्ट्रवादीसोबत जाण्याचा निर्णय घेतला. आता भाजपला 102 जागी उमेदवार उभे करावे लागणार आहेत.
उमेदवारी दाखल साठी उरले अवघे 48 तास
उमेदवारी दाखल करण्यासाठी अवघ्या 48 तासांचा अवधी राहिला असून, अद्यापही भाजपने उमेदवारी यादी जाहीर केली नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाने पहिली यादी जाहीर करत आघाडी घेतली आहे. परंतु भाजपाने अंतर्गत असलेल्या धुसफुशीमुळे उमेदवारी यादी जाहीर करण्यासाठी विलंब लावला आहे.