सोलापूर : शहरातील राजकारणात दिवसागणिक व क्षणाक्षणाला राजकीय उलथापालथ होत असून भाजपच्या माजी नगरसेविका राजश्री चव्हाण यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली असून तत्काळ राष्ट्रवादीचे घड्याळ हाती बांधले तर भाजपचे माजी नगरसेवक वैभव हत्तुरे यांच्यासह अनेक समर्थक भाजपला सोडून राष्ट्रवादीत दाखल झाले. या पक्षांतराने हद्दवाढ भागातील भाजपचे कमळ कमकुवत तर राष्ट्रवादी बळकट झाली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडील ओढा अद्याप सुरूच आहे. माजी नगरसेविका चव्हाण, अनिल चव्हाण यांच्यासह सिद्धार्थ सर्वगोड, राजू काळे, सागर हत्तुरे, सुकेशिनी गंगोडा, चंद्रकांत नवत्रे, किरण सर्वगोड, सुरेखा काळे व श्रीकांत हत्तुरे आदी माजी नगरसेवक हत्तुरे समर्थकांनी भाजप सोडला आणि राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. हा पक्ष प्रवेश राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार, जिल्हा अध्यक्ष उमेश पाटील, कार्याध्यक्ष जुबेर बागवान व प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. दरम्यान, माजी नगरसेवक हत्तुरे यांचे जुळे सोलापुरातील अनेक समर्थकही राष्ट्रवादीत दाखल झाल्याने हद्दवाढ भागात या पक्षाची ताकद वाढली आहे.
माजी नगरसेवक अप्पासाहेब हत्तुरे यांचे हद्दवाढ भागात वलय असून यापूर्वी त्यांनी अपक्ष म्हणून पालिकेची निवडणूक लढून ती जिंकली होती. शिवाय, अन्य तीन अपक्ष नगरसेवकांना निवडून आणण्यातही त्यांची भूमिका महत्त्वाची राहिली. चव्हाण व हत्तुरे समर्थकांनी केलेला पक्ष प्रवेश हा राष्ट्रवादीस महत्त्वाचा मानला जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सतत प्रवेश होत आहेत. या पक्ष प्रवेशाने शहरातील पक्षाचे बळ वाढत असून काळे व हत्तुरे समर्थकांच्या प्रवेशाने जुळे सोलापूरसह हत्तुरे वस्ती भागात राष्ट्रवादी काँग्रेस अधिक मजबूत झाला आहे. या भागातील पक्षाच्या उमेदवारांचा विजय आता सुकर झाला आहे.संतोष पवार, शहर जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस