

सोलापूर : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणांना वेग आला आहे. भाजपकडून अपेक्षित जागावाटप न मिळाल्याने अखेर शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाने आक्रमक भूमिका घेतली व राष्ट्रवादी अजित पवार गटासोबत युती करीत 50-50 टक्के वाटपावर एकमत केले. यातून भाजपसमोर आता एकला चलो रे हा पर्याय आहे.
रविवारी दुपारी झालेल्या बैठकीत शिंदे गटाने भाजपला दे धक्का दिला व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाशी थेट हातमिळवणी केली. दोन्ही पक्षांमध्ये रविवारी झालेल्या महत्त्वाच्या बैठकीत आगामी महापालिका निवडणूक 50 टक्के जागावाटपाच्या फॉर्म्युल्यावर लढवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे एकूण 102 जागांपैकी दोन्ही गटांना प्रत्येकी 51 अशा प्रत्येक प्रभागातील राजकीय ताकद, स्थानिक समीकरणे आणि पक्षाची पकड पाहून प्रभागनिहाय उमेदवार निश्चित केले जाणार आहेत.
एकनाथ शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार
गटाची बैठक रविवारी सोलापुरातील एका हॉटेलमध्ये झाली. या बैठकीस शिंदे गटाकडून माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, उत्तमप्रकाश खंदारे, जिल्हाप्रमुख अमोल शिंदे, मनीष काजळे, अमर पाटील, शहराध्यक्ष सचिन जाधव, महेश साठे, मनोज शेजवाल, तर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून शहराध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान, सुधीर खरटमल, आनंद चंदनशिवे, यू. एन. बेरीया उपस्थित होते. या बैठकीत कोणत्याही परिस्थितीत भाजपविरोधात निवडणूक लढवायची आणि महापौरपद शिंदे गट - अजित पवार गटाकडे आणायचे, असा ठाम निर्धार व्यक्त करण्यात आला. उद्या प्रभागनिहाय जागावाटप जाहीर होण्याची शक्यता असून त्यानंतर पक्षाकडून एबी फॉर्मचे वाटप केले जाणार आहे.