भाजपची नवी खेळी; बंडखोरी टाळण्यासाठी केवळ अर्धातास आधी मिळणार एबी फॉर्म Pudhari Photo
सोलापूर

Solapur Municipal Corporation Election : भाजपची नवी खेळी; बंडखोरी टाळण्यासाठी केवळ अर्धातास आधी मिळणार एबी फॉर्म

पालकमंत्री गोरे यांनी पदाधिकाऱ्यांशी उमेदवारीबाबत केली चर्चा

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : भाजपातील इच्छुकांची संख्या मोठ्याप्रमाणात असून, बंडखोरी टाळण्यासाठी पक्षाचे एबी फॉर्म ऐनवेळी म्हणजे मंगळवारी (दि. 30) अधिकृत उमेदवारांना वाटप केले जाणार आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याशी चर्चा करून पालकमंत्री जयकुमार गोरे सोमवारी सायंकाळी सोलापुरात पोहोचले.

पालकमंत्री गोरे यांनी पक्षातील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून उमेदवारीबाबत चर्चा केली. दरम्यान, आ.विजयकुमार देशमुख यांचे सुपुत्र माजी नगरसेवक डॉ.किरण देशमुख यांनी शेळगी भागातून म्हणजे प्रभाग क्रमांक दोनमधून उमेदवारी अर्ज दाखल केले. दुसरीकडे मागील 20 वर्षांपासून भाजपचे नगरसेवक असलेले श्रीनिवास करली यांनी पक्षाला सोडचिट्टी देत एकनाथ शिंदे यांचा धनुष्यबाण हाती घेतला आहे. त्यामुळे भाजपला धक्का बसला आहे. विधानसभा निवडणुकीदरम्यान आ. सुभाष देशमुख यांच्या उमेदवारीला श्रीनिवास करली यांनी विरोध दर्शविला होता. त्यामुळे आज मंगळवारी शेवटच्यादिवशी अनेक नाट्यमय राजकीय घडामोडी होण्याची शक्यता आहे. प्रभाग क्रमांक 7 मधून भाजपाकडून पद्माकर काळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले असून, श्रीकांत घाडगे यांना उमेदवारी दिल्यास त्यांचा प्रचार करण्याची भूमिका जाहीर केली आहे. बिज्जू प्रधाने, मंदाकिनी तोडकरी, वंदना गायकवाड, विजय इप्पाकायल आदींनी भाजपाकडून उमेदवारी दाखल केली आहे.

प्रथमेश कोठेंची उमेदवारी कुठून?

प्रभाग क्रमांक 10, 11 हा शहर उत्तर विधानसभा मतदार संघात असून, हे दोन्ही प्रभाग स्व. महेश कोठे यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. या प्रभागातून आ.देवेंद्र कोठे यांनी प्रथमेश कोठे, युवराज सरवदे यांच्यासह अन्य समर्थकांना उमेदवारी मिळावी यासाठी लॉबिंग सुरू केली आहे. प्रथमेश कोठे कुठल्या प्रभागातून उभारणार याबाबत अद्याप स्पष्टता झालेली नाही.

भाजपकडून इच्छुकांची कोंडी

भाजपातील अनेक निष्ठावंत कार्यकर्त्यांनी शिंदे सेनेत जाण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु, भाजपकडून उमेदवारी मिळते का, याच्या प्रतीक्षेत आहेत. दुसरीकडे भाजपने नवी चाल रचली असून, ऐनवेळी आपला कार्यकर्ता अन्य पक्षात जाऊन उमेदवारी घेण्यास उसंत मिळू नये, यासाठी विलंब लावला आहे. त्यामुळे इच्छुकांची चांगलीच कोंडी झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT