Massive Fire In Parking Akkalkot Pudhari
सोलापूर

Akkalkot Fire | अक्कलकोटमध्ये पार्किंगमध्ये भीषण आग; ५ ते ६ ट्रक जळून खाक

सोलापूर-अक्कलकोट महामार्गावरील खासगी पार्किंगमध्ये दुर्घटना; अग्निशमन दलाकडून आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न

पुढारी वृत्तसेवा

Massive Fire In Parking Akkalkot

सोलापूर : अक्कलकोट येथे सोलापूर-अक्कलकोट महामार्गालगत असलेल्या एका खासगी पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या ट्रकना भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत आतापर्यंत जवळपास पाच ते सहा ट्रक जळून खाक झाल्याची प्राथमिक माहिती आहे. एका ट्रकला लागलेली आग शेजारी उभ्या असलेल्या अन्य ट्रकपर्यंत पसरल्याने आगीने काही वेळातच रौद्ररूप धारण केले. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सोलापूर-अक्कलकोट महामार्गावरील खासगी वाहनतळामध्ये अनेक ट्रक पार्किंगसाठी उभ्या करण्यात आल्या होत्या. यापैकी एका ट्रकला अचानक आग लागली. सुरुवातीला आगीचे स्वरूप मर्यादित होते. मात्र, काही वेळातच आगीच्या ज्वाळांनी शेजारी उभ्या असलेल्या ट्रकलाही आपल्या विळख्यात घेतले. एकापाठोपाठ एक ट्रक आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने घटनास्थळी धुराचे मोठे लोट पसरले.

आग वेगाने पसरत असल्याने वाहनतळातील अन्य ट्रकनाही धोका निर्माण झाला आहे. आतापर्यंत पाच ते सहा ट्रक जळून खाक झाल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, या खासगी पार्किंगमध्ये अद्यापही अनेक ट्रक उभ्या असल्याने आग आणखी पसरू नये, यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

घटनेची माहिती मिळताच अक्कलकोट नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या जवानांकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. आगीच्या तीव्रतेमुळे जवानांसमोर आव्हान निर्माण झाले असून, अन्य वाहनांपर्यंत आग पोहोचू नये, यासाठी विशेष खबरदारी घेतली जात आहे.

दरम्यान, ट्रकना आग नेमकी कशामुळे लागली, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या दुर्घटनेत नेमके किती आर्थिक नुकसान झाले, तसेच कोणतीही जीवितहानी झाली आहे का, याबाबतची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT