

करमाळा : तालुक्यातील कोर्टी येथील ज्ञानप्रबोधन मतिमंद निवासी विद्यालयातील मतिमंद विद्यार्थ्यांनी एक नव्हे, दोन नव्हे, तर तब्बल २५ हजार पणत्यांची निर्मिती केल्याने एक कुतूहलाचा व उत्सुकतेचा विषय ठरला आहे.
दिवाळीचा सण म्हणजे प्रकाश, आनंद आणि उत्साहाचा उत्सव. मात्र याच प्रकाशपर्वाच्या निमित्ताने विशेष म्हणजे मतिमंद मुलांच्या आयुष्यात स्वावलंबनाचा प्रकाश निर्माण करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य कोर्टी येथील ज्ञानप्रबोधन मतिमंद निवासी विद्यालय आणि समर्पण प्रौढ मतिमंद मुलांची निवासी कार्यशाळा यांच्या माध्यमातून यशस्वीपणे करण्यात आला आहे. संस्थापकीय अध्यक्षा जयश्री बागडे सर्व कर्मचारी मार्गदर्शक शिक्षक वृंद यासाठी प्रयत्न करीत आहेत.
विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे, या दोन्ही संस्था अत्यंत ग्रामीण आणि दुष्काळग्रस्त भागात पूर्णपणे विनाअनुदानित तत्त्वावर चालवल्या जात आहेत. संस्थांना शासनाकडून कोणत्याही प्रकारचे आर्थिक अनुदान मिळत नाही. अशा परिस्थितीत विशेष मुलांचे शिक्षण, निवास, संगोपन आणि व्यवसाय प्रशिक्षणाची जबाबदारी सांभाळत संस्था सातत्याने आपले कार्य पुढे नेत आहेत. संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष जयश्री बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेत आहेत. समाजातील दानशूर व्यक्ती, उद्योजक आणि कंपन्यांनी संस्थेला आर्थिक सहकार्य तसेच विशेष मुलांनी तयार केलेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.