मोडनिंब : सोलापूर–पुणे राष्ट्रीय महामार्गावरील वरवडे टोल नाका येथे मंगळवारी (दि. ४ ऑगस्ट) सायंकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास शिवशाही बसचे ब्रेक अचानक निकामी झाल्याने मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र, बसचालकाने प्रसंगावधान राखून बस रस्त्यालगतच्या मोकळ्या जागेत वळविल्यामुळे मोठी जीवितहानी टळली. या घटनेत बसमधील सर्व १४ प्रवासी सुखरूप बचावले.
सोलापूरहून पुण्याकडे जाणारी शिवशाही बस (क्र. MH 06 BW 3522) भरधाव वेगाने जात असताना वरवडे टोल नाका परिसरात तिचे ब्रेक अचानक फेल झाले. बसचे चालक शिवशरण भोगेश्वर म्हेत्रे (वय ५६, रा. अक्कलकोट) यांनी अत्यंत धैर्य आणि प्रसंगावधान दाखवत बस रस्त्यालगतच्या मोकळ्या जागेकडे वळविली. यावेळी बस विटा टाकलेल्या जागेत जाऊन महावितरणच्या विद्युत खांबावर आदळली.
धडकेमुळे विद्युत खांब उपटून पडला आणि त्यावरील वीजतारा बसवर पडल्या. सुदैवाने कोणतीही जीवितहानी किंवा गंभीर दुखापत झाली नाही. बसमधील सर्व १४ प्रवाशांना वरवडे टोल नाका येथील गस्ती पथक आणि रुग्णवाहिका पथकाने तत्काळ सुरक्षितपणे बाहेर काढले. त्यानंतर प्रवाशांच्या पुढील प्रवासाची व्यवस्था दुसऱ्या एसटी बसद्वारे करण्यात आली. घटनेची माहिती मिळताच वरवडे टोल नाका येथील रुग्णवाहिका पथकातील डॉ. महेंद्र ताकतोडे, रुग्णवाहिका चालक बंडू गायकवाड, तसेच गस्ती पथकातील विजय साळुंके, अभिजीत गुजरे आणि नवनाथ मोरे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले.
दरम्यान, मोडनिंब महामार्ग पोलीस मदत केंद्राचे कर्मचारीही तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. या अपघाताची माहिती वरवडे टोल नाका गस्ती पथकाचे प्रमुख विजय साळुंके यांनी टेंभुर्णी पोलीस ठाण्यातील अपघात विभागाचे अधिकारी सरडे यांना दिली असून, पुढील कार्यवाही सुरू आहे. चालकाच्या प्रसंगावधानामुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळल्याने प्रवासी आणि उपस्थित नागरिकांनी समाधान व्यक्त केले.