सोलापूर - विहिरीतील मुरूम उपसा करण्यासाठी स्थळ पाहणी करून सकारात्मक अहवाल देण्यासाठी तब्बल एक लाख रुपयांची लाच मागणाऱ्या उत्तर सोलापूर तालुक्यातील तिन्हे येथील मंडल अधिकारी विजयकुमार माने याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले. त्याच्यावर सलगर वस्ती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार हा शेतीसोबत मुरूम उपशाचे काम करतो. विहीर खोदाईतून निघालेल्या मुरुमाची वाहतूक करण्यासाठी त्याने उत्तर सोलापूर तहसीलदारांकडे रितसर अर्ज केला होता.
त्यानंतर तहसीलदारांनी तिन्हे मंडल अधिकारी विजयकुमार माने यांना स्थळ पाहणी करून अहवाल देण्याच्या सूचना केल्या. त्यानंतर तक्रारदाराने माने यांच्याशी संपर्क साधल्यानंतर स्थळ पाहणी करून सकारात्मक अहवाल देण्यासाठी माने याने एक लाख रुपयांची मागणी केली.
दरम्यान, माने याने लाचेची मागणी करूनही लाच स्वीकारली नव्हती. याचा संशय आल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मानेला लाच मागितल्याबाबत तपास केला.