जळगाव : माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या वाढदिवसानिमित्त होणाऱ्या सोहळ्यात खडसे यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरू झाल्याने याबाबत खडसे यांनी खुलासा करताना 'होय, मला अमित शाह यांनीच फोन करून दिल्लीला बोलवले होते. आप भाजप जॉईन करो.' असे म्हटल्याचा दावा केला आहे. तसेच भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी 'तुम्हाला जर पक्षात प्रवेश दिला, तर स्थानिक लोक काम करणार नाहीत.' तसेच 'लोकसभेची जागा पाडून टाकू', अशी थेट ब्लॅकमेलिंग केली जात असल्याचेही वरिष्ठांनी सांगितल्याचा दावा खडसे यांनी माध्यमांशी बोलताना केला.
खडसे म्हणाले की, माझ्या भाजप प्रवेशाच्या वावड्या उठविल्या जातात. यापूर्वीच मला अमित शाह यांनी दिल्लीत बोलावले होते. एका बाजूला खडसे यांच्या भाजप प्रवेशाला गिरीश महाजन विरोध नसल्याचे सांगतात, तर दुसऱ्या बाजूला खडसे यांना पक्षात घेतले तर आम्ही स्थानिक पातळीवर काम करणार नसल्याची तसेच जागा पाडण्याची भाषा करतात, अशी टीका त्यांनी महाजन यांच्यावर केली आहे. अमित शाह यांनी 'तुम्ही लोकसभेत आमचे काम करा, पुढे पाहू.' असे स्पष्ट म्हटले होते. मग माझ्या पक्षप्रवेशाला नेमका विरोध करतोय कोण? असा थेट सवाल खडसेंनी उपस्थित केला आहे.
विनोद तावडेंच्या भेटीवरही स्पष्टीकरण मुंबईत झालेल्या विनोद तावडे यांच्या भेटीबाबत बोलताना खडसे यांनी स्पष्ट केले की, ही भेट केवळ एक औपचारिक भेट होती. त्यांनी माझ्या तब्येतीची विचारपूस केली. याव्यतिरिक्त आमच्यात कुठलाही राजकीय विषय झालेला नाही. मी त्यांना वाढदिवसानिमित्त येण्यासंदर्भात बोललो असल्याचेही खडसे यांनी स्पष्ट केले
भाजप प्रवेशाच्या या संपूर्ण नाट्यावर पूर्णविराम लावताना खडसे यांनी अखेर आपली भूमिका जाहीर करताना मला आता भाजपमध्ये प्रवेश करण्यात कोणताही इंटरेस्ट राहिलेला नाही. मी शरद पवार यांच्यासोबत आहे आणि शेवटपर्यंत त्यांच्यासोबतच राहिल. माझे कार्यकर्ते हे भाजपमध्ये जातील, मी नाही. माझे कार्यकर्ते इच्छुक आहेत, असेदेखील त्यांनी म्हटले.