सोलापूर

सोलापूर : मुस्ती येथील हरणा नदीवरील पुलासाठी साडेसात कोटी मंजूर

दिनेश चोरगे

सोलापूर; पुढारी वृत्तसेवा : दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुस्ती गावाजवळील हरणा नदीवरील पुलासाठी शासनाकडून ७ कोटी ७० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे या समस्येचे निवेदन देऊन तसेच पाठपुरावा करून पुलाची मागणी केली होती. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी नुकत्याच झालेल्या अधिवेशनात नदीवरील पुलाच्या बांधकामासाठी ७ कोटी ७० लाख रुपये मंजूर केले असल्याची माहिती मुस्ती गावचे सरपंच नागराज पाटील यांनी दिली.

मुस्ती गावची लोकसंख्या जवळपास ९ हजाराच्या आसपास आहे. या गावाजवळून १०० ते २०० मीटर अंतरावर हरणी नदी आहे. नदीच्या दोन्ही बाजूला लोकवस्तीसह शेतीही आहे. दोन्ही बाजूच्या नागरिकांना नदीपार करून ये- जा करण्यास आडचण होती. नदी पार करण्यासाठी एकमेव बंधाऱ्याचाच पर्याय नागरिकांपुढे होता. ऐन पावसाळ्यात या धोकादायक बंधाऱ्यावरूनच ग्रामस्थांना प्रवास करावा लागायचा. यामुळे दोघांना आपला जीव गमवावा लागला होता. त्यानंतर ग्रामस्थांनी आंदोलनाच्या माध्यमातून पालकमंत्री तसेच जिल्हाधिकारी यांच्याकडे यासंदर्भात वेळोवेळी निवेदने देऊन हरणी नदीवर पुलाची मागणी केली होती. तसेच सरपंच नागराज पाटील तसेच उपसरपंच रमेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मनिष काळजे यांची भेट घेऊन त्यांना पुलाच्या बांधकामासाठी निधीची मागणी केली होती. जिल्हाप्रमुख काळजे यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून सतत पाठपुरावा करत मुख्यमंत्र्यांकडे निधीची मागणी लावून धरली होती. नुकत्याच झालेल्या अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुस्ती गावाजवळील हरणी नदीवर ७५ मीटर लांबीचा पूल बांधण्यासाठी सुमारे ७ कोटी ७० लाख रुपयांचा निधी मंजूर केला. आता लवकरच या कामाचे टेंडर निघून कामाला सुरुवात करण्याच्या दृष्टीने पुढचे पाऊल उचलणार असल्याचे सरपंच पाटील यांनी सांगितले.

            हेही वाचलंत का ? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT