सोलापूर

Sina River water crisis Solapur | सीना नदी पडली कोरडीठाक

नदीकाठच्या गावांसमोर पाणीटंचाईचे भीषण संकट

पुढारी वृत्तसेवा

माढा : मागील सहा महिन्यांपूर्वी सीना नदीला आलेल्या महापुरानंतर आता नदीकाठच्या गावांमध्ये पाणीटंचाईचे संकट गडद होत चालले आहे. महापुरामुळे अनेक विहिरी आणि बोअरवेल गाळाने बुजल्या होत्या. त्यामुळे परिसरातील अनेक पाणीस्त्रोत अद्यापही पूर्ववत झालेले नाहीत. आता सीना नदी पूर्णपणे कोरडी पडल्याने नागरिक, शेतकरी आणि पशुधनासमोर गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत.

उजनी धरणातील पाणीपातळी घटल्याने बोगद्यातून व कोळेगाव धरणातून सीना नदीत पाणी सोडणे सध्या शक्य होत नसल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे नदीपात्र कोरडे पडले असून नदीकाठच्या वाड्या-वस्त्यांवर जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. ग्रामपंचायतींच्या पाणीपुरवठा योजनांचे स्त्रोतही अडचणीत आल्याने आगामी काळात नदीकाठच्या गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे.

पाण्याभावी शेतीवरही मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. या परिसरात ऊस हे प्रमुख पीक असून पाणी उपलब्ध झाले नाही तर उसाच्या उत्पादनात मोठी घट होऊ शकते. आधीच महापुराचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांसमोर आता दुष्काळसदृश परिस्थिती उभी ठाकली आहे.

दरम्यान, नदीपात्र कोरडे पडल्याने अवैध वाळू उपशालाही वेग आला आहे. नदीपात्रातील वाळूचे मोठ्या प्रमाणावर उत्खनन सुरू असून त्यावर प्रभावी नियंत्रण नसल्याची तक्रार स्थानिक नागरिकांकडून होत आहे. एकंदरीत सीना नदीकाठच्या गावांमधील परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून प्रशासनाने तातडीने उपाययोजना करून नदीत पाणी उपलब्ध करून देण्याची मागणी नागरिक व शेतकरीवर्गातून होत आहे.

महापुरामुळे विहिरी आणि बोअरवेल गाळाने बुजल्या. आता नदीही कोरडी पडल्याने जनावरांच्या पाण्याच्या आणि पिकांच्या सिंचनाचा प्रश्न गंभीर झाला आहे. वेळेत पाणी मिळाले नाही तर उसासह इतर पिकांचे मोठे नुकसान होईल.
- अभिजित उबाळे, दारफळ
सीना नदीकाठच्या गावांतील पाणीटंचाई गंभीर आहे. जलसंपदा मंत्र्यांकडे पाठपुरावा करून नदीत पाणी सोडण्याची मागणी केली आहे. पाणी न सोडल्यास या परिसरातील जनावरांच्या व माणसांच्या पिण्याच्या पाण्याची सोय व चाऱ्याची सोय करण्यासाठी शेतकरी, नागरिक आणि पशुधनाच्या हितासाठी शासनाने तातडीने निर्णय घ्यावा.
- आमदार अभिजित पाटील

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT