सोलापूर ः सोलापुरातील शिवसेना नेते प्रकाश दामोदर वानकर यांच्या घरातून 15 लाख 80 हजार रुपयांची चोरी झाली आहे. प्रकाश वानकर हे देगावजवळील राजमुद्रा रेसिडन्सी येथे राहतात. शनिवार (दि. 27) सायंकाळी सातच्या सुमारास त्यांच्या राहत्या घरी अज्ञात इसमाने प्रवेश केला.
घराच्या बेडरूममधील कपाटातील रोख 15 लाख 80 हजार रुपयांची रक्कम चोरुन नेली. दुसऱ्या दिवशी 28 डिसेंबर रोजी त्यांना पैसे चोरीला गेल्याचे समजले. त्यानंतर त्यांनी सलगर वस्ती पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. प्रकाश वानकर हे ज्येष्ठ शिवसेना नेते असून, जिल्हाप्रमुख गणेश वानकर यांचे वडील आहेत. ऐन निवडणुकीच्या काळात घरात ठेवलेली एवढी मोठी रोख रक्कम चोरीला गेल्याने एकच खळबळ उडाली आहे. या घटनेचा तपास पोलिस उपनिरीक्षक कुतवळ करीत आहेत.