सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी डोंगरमाथ्यावर लाखो शिवभक्तांनी मोठी गर्दी केली होती. Pudhari
सोलापूर

Mungi Ghat Kawad Sohala | मुंगी घाटात ‘हर हर महादेव’चा जयघोष; कावड चढवण्याचा पारंपरिक सोहळा भक्तिमय वातावरणात

Solapur Kawad | सासवड (जि. पुणे) येथील संत तेली भुतोजी महाराज यांच्या मानाच्या कावडीचा हा सोहळा चैत्र शुद्ध रामनवमीपासून सुरू

पुढारी वृत्तसेवा

Shikhar Shingnapur Kawad Sohala

नातेपुते : ‘हर हर महादेव’च्या गजरात, वाद्यांच्या निनादात आणि फटाक्यांच्या आतषबाजीत शिखर शिंगणापूरच्या अवघड मुंगी घाटातून कावड चढवण्याचा पारंपरिक सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला. या सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी डोंगरमाथ्यावर लाखो शिवभक्तांनी मोठी गर्दी केली होती.

सासवड (जि. पुणे) येथील संत तेली भुतोजी महाराज यांच्या मानाच्या कावडीचा हा सोहळा चैत्र शुद्ध रामनवमीपासून सुरू होतो. पवित्र संगमातील जल घेऊन कावड शिखर शिंगणापूरकडे प्रस्थान करते. यंदा ही कावड ३० मार्च रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास सोलापूर जिल्ह्यात दाखल झाली. यावेळी माळशिरस पंचायत समितीचे सभापती दत्ता मगर, उपसभापती मनीषा पाटील, तहसीलदार सुरेश सेजुळ, नायब तहसीलदार अमोल कदम, गटविकास अधिकारी रघुनाथ पांढरे, जिल्हा परिषद सदस्य अर्जुनसिंह मोहिते-पाटील, पोलिस अधिकारी विशाल वायकर आदी मान्यवरांनी स्वागत केले.

यानंतर सोलापूर व सातारा जिल्ह्याच्या सीमेवरील कोथळे गावाजवळील ओढ्यात कावडी भेटीचा पारंपरिक सोहळा पार पडला. कोल्हापूर संस्थानच्या मानाच्या कावडीने संत तेली भुतोजी महाराजांच्या कावडीला प्रदक्षिणा घालून भेट दिली. सन १३१० पासून सुरू असलेली ही परंपरा पाहण्यासाठी रणरणत्या उन्हातही भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सायंकाळी साडेपाचच्या सुमारास कावड मुंगी घाटाच्या पायथ्याशी पोहोचली. आरती व फटाक्यांच्या आतषबाजीनंतर शिवभक्तांनी मानवी साखळी करत अवघड घाट चढाईस सुरुवात केली. दरम्यान, पावसाच्या सरी आणि विजांच्या कडकडाटातही भक्तांनी अखंड उत्साह कायम ठेवत घाटातील तिन्ही टप्पे पार केले. ‘हर हर महादेव’च्या जयघोषात सायंकाळी सातच्या सुमारास कावड शिखर शिंगणापूर येथे पोहोचली. सातारा जिल्हा प्रशासनाच्या वतीने तोफांची सलामी देऊन कावडीचे स्वागत करण्यात आले.

रात्री मोठ्या महादेवाला कावडीत आणलेल्या पवित्र पाण्याने अभिषेक करून यात्रेची सांगता करण्यात आली.

चोख बंदोबस्त व आरोग्य सुविधा
सोहळा निर्विघ्न पार पडावा यासाठी पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष वाळके व पोलीस निरीक्षक विशाल वायकर यांच्या मार्गदर्शनाखाली ६ अधिकारी, ८२ कर्मचारी आणि राखीव पोलिस दल तैनात होते. त्यामुळे वाहतुकीत कोणतीही अडचण निर्माण झाली नाही.

प्राथमिक आरोग्य केंद्र मांडवे व मोरोची यांच्या वतीने कोथळे व मुंगी घाट परिसरात ८ रुग्णवाहिकांसह आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. डॉ. अभय मेहता, डॉ. सुचिता सावंत, शिवानी लाड यांच्यासह सुमारे ५४ आरोग्य कर्मचाऱ्यांनी सेवा बजावली. पाणीपुरवठा विभागानेही घाट परिसरात टँकरची व्यवस्था केली होती.

२,४९० भाविकांवर उपचार
गेल्या तीन दिवसांत कोथळे व मुंगी घाट परिसरात २,४९० भाविकांवर उपचार करण्यात आले. तसेच डोर्लेवाडी (ता. बारामती) येथील बबन भोपळे यांचा अपघात झाल्याने त्यांना तातडीने रुग्णवाहिकेतून मोरोची येथे हलविण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT