

दक्षिण सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप येथील एका 25 वर्षांच्या जेसीबी व्यावसायिकाला पैशाच्या कारणावरून पळवून नेऊन जीवे ठार मारण्याची धमकी देऊन त्यांच्या कुटुंबाकडे तब्बल 50 लाख रुपयांची खंडणी मागणी केल्याची घटना घडली.
या घटनेतील तीन आरोपींना गुन्हा दाखल झाल्यावर अवघ्या सहा तासांत मंद्रूपच्या पोलिस अधिकाऱ्यांनी संबंधित खंडणीखोरांना कर्नाटकातील कलबुरगी येथून ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सूरज अर्जुन राठोड (वय 25, रा. मंद्रूप, असे ता. द. सोलापूर) अपहरण झालेल्या युवकाचे नाव आहे. सूरज हे आपले वडील अर्जुन राठोड, आई कमल राठोड, पत्नी निकिता आणि दोन मुलीसह मंद्रूप येथे राहतात. सूरज हे जेसीबीच्या कामाचे कॉन्ट्रॅक्टचे काम करतात. 23 मार्च रोजी त्यांचे आई वडील हे पोहरादेवीच्या दर्शनासाठी नांदेडला गेले होते. 24 मार्च दुपारी तीन वाजता सूरज आपल्या पत्नी निकिता राठोड यांना मी विजापूरला जाऊन येतो, असे सांगून आपल्या फॉर्च्यूनर कार (एम. एच. 18. बी.पी.1852) मधून गेले. मात्र, ते घरी परत आले नाहीत. 26 रोजी सूरज यांनी आपल्या वडिलांना फोनवरून सांगितले की, मला काही लोकांनी पळवून नेले आहे आणि अपहरणकर्ते हे 50 लाख रुपयांची मागणी करीत आहेत. अपहरणाची माहिती पोलिसांना दिली तर ते मला ठार मारतील, असे सांगितले. यावेळी सूरज हे आपल्या कुटुंबाच्या मोबाईलद्वारे संपर्कात कुठे पळवून नेले आहे, याची माहिती त्यांना मिळत नव्हती. शेवटी पत्नी निकिता यांनी आपल्या पतीच्या जीवितास धोका होऊ नये यासंदर्भात मंद्रूप पोलीस ठाण्यात अपहरणाची फिर्याद दाखल केली.
घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिस निरीक्षक शंकर पटवारी यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. त्यांनी तांत्रिक माहितीच्या आधारे अवघ्या सहा तासांत आरोपींचा शोध घेऊन या प्रकरणातील आरोपी गोपाळ मल्लाप्पा जवळगी (रा. वत्याळ, ता. सिंदगी), राघवेंद्र यल्लाप्पा जवरगीकर व भवानीराज अरविंद गोडबोले (दोघेही रा. बसवनगर, कलबुरगी) या तिघांना कलबुरगीत शिताफीने ताब्यात घेतले आहे.