बार्शी : आमदार राजेंद्र राऊत यांच्या कल्पनेतून साकारण्यात आलेले शहीद स्मारक. Pudhari Photo
सोलापूर

बार्शीत आज शहीद स्मारक लोकार्पण सोहळा

पुढारी वृत्तसेवा

बार्शी : पुढारी वृत्तसेवा

आमदार राजेंद्र राऊत यांच्या कल्पनेतून व आर्थिक सहयोगाने बार्शी येथील अलीपूर व ऊपळाई लिंक रस्त्यावर नव्याने विकसित करण्यात आलेल्या शहीद स्मारकाचा अनावरण व लोकार्पण सोहळा रविवार, दि. 6 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता वीरमाता-पत्नींंच्या हस्ते व आमदार राजेंद्र राऊत यांच्या उपस्थितीत होणार आहे. यावेळी ब्रिगेडियर रसल डिसुजा (कमांडर एमआयसी अँड एस, अहमदनगर) हे विशेष उपस्थित राहणार आहेत. शहीद स्मारक उभारणीची संकल्पना राबवून भरीव निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल बार्शी तालुका माजी सैनिक संघटनेच्या वतीने आमदार राजेंद्र राऊत यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे.

मुख्याधिकारी बाळासाहेब चव्हाण, नगर अभियंता विवेक देशमुख, सेवानिवृत्त कर्नल रवी घोडके, दीपक ठोंगे ,माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष चांगदेव सुरवसे, संभाजी मोरे, मिलिंद तुंगार , वैजिनाथ बोबडे यांच्यासह माजी सैनिक उपस्थित राहणार आहेत. बार्शी नगरपरिषदेने विकसित केलेल्या या उद्यानात सन 1971 च्या भारत पाकिस्तान युध्दातील टी-55 हा रणगाडा शहीद जवानांच्या स्मृती जपण्यासाठी ठेवण्यात आला आहे. महाराष्ट्रातील नगरपरिषद स्तरावरील उद्यान विकसनाबाबतीत विचार केला असता शहीद स्मारक आणि टी-55 रणगाडा मागविण्याबाबत बार्शी नगरपरिषद एकमेव नगरपरिषद ठरली आहे. खुल्या 26 गुंठे जागेत हे उद्यान विकसित करण्यासाठी ठेकेदार राजेश डिडवळ व अरूण शिंदे यांची निविदा मंजूर करण्यात आली होती.

44 लाख रुपयांत उद्यान विकसित करणे, पथ दिवे तयार करणे, झाडे व रोपे लावणे, लॉन तयार करणे व शहीद स्मारकाकरिता व रणगाड्या करिता (टी-55) 2 चबुतरे बांधणे इत्यादी कामांचा समावेश होता. नगरपरिषद व माजी सैनिक यांनी खडकी लष्करी छावणी, पुणे यांच्याकडे सतत पाठपुरावा करून रणगाडा उपलब्ध करून घेतला आहे. सदर रणगाडा 1971च्या भारत पाकिस्तान युध्दातील असून रशियन बनावटीचा आहे. सदर रणगाड्याचे वजन अंदाजे 38 टन एवढे आहे. सदर रणगाडा हा टी-55 मॉडेलचा आहे.

मान्यवरांकडून शहीद स्मारकाची पाहणी

आमदार राजेंद्र राऊत, मुख्याधिकारी बाळासाहेब चव्हाण, नगर अभियंता विवेक देशमुख यांच्यासह माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी यांनी शहीद स्मारकास शनिवारी भेट दिली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT