सोलापूर : पुढारी वृत्तसेवा
लोणावळा-मंकी हिल दरम्यान सोलापूर-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसच्या डबा क्रमांक सी-12 च्या पेंटोग्राफमध्ये (विद्युत पुरवठा करणारे यंत्र) बिघाड झाल्याची घटना बुधवारी (दि. 2) सकाळी दहा वाजून 21 मिनिटांनी घडली. यामुळे सोलापूरहून मुंबईला जाणारे प्रवासी दीड तास गाडीतच अडकून पडले. पेंटोग्राफमध्ये बिघाड झाल्याने गाडीतील लाइट, एसी, डिस्प्ले बंद पडल्याने प्रवासी मात्र घामाने ओलेचिंब झाले. वंदे भारत एक्स्प्रेसची सेवा विस्कळीत झाल्याने प्रवाशांचे हाल झाले.
सोलापूर-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस लोणावळा येथे पोहोचली. लोणावळा-मंकीहल दरम्यान गाडी अचानक बंद झाली. गाडी बंद झाल्याने प्रवासी घाबरले. गाडी बराच वेळ थांबल्याने प्रवासी एकमेकांना विचारपूस करू लागले. नेमके काय झाले हे कोणालाच कळेना. तब्बल अर्ध्या तासानंतर कळाले की गाडीच्या पेंटोग्राफमध्ये बिघाड झाला आहे. ही गाडी एकाच ठिकाणी थांबल्याने अनेक गाड्यांवर परिणाम झाला. तत्काळ रेल्वे प्रशासनाकडून दुरुस्तीचे काम सुरू केले. पेंटोग्राफमधील बिघाडामुळे काही काळ मुंबईकडे जाणार्या मार्गावरील रेल्वेची सेवा विस्कळीत झाली. सोलापूर-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस तब्बल दीड तासानंतर मुंबईच्या दिशेने रवाना झाली.
सकाळी सहा वाजून पाच मिनिटांनी सोलापूर स्थानकावरून निघालेली वंदे भारत एक्स्प्रेस दुपारी साडेबारा वाजता मुंबईत दाखल होते; पण लोणावळा-मंकीहिल दरम्यान झालेल्या बिघाडामुळे ही गाडी तब्बल दीड तास उशिराने म्हणजे दुपारी दोन वाजून तीन मिनिटांनी मुंबईमध्ये पोहोचली. गाडी उशिराने पोहोचल्यामुळे प्रवाशांचे पुढील कामाचे नियोजन विस्कळीत झाले.