Schoolboy ran away from home while playing mobile game
वैराग : पुढारी वृत्तसेवा
मोबाईल गेमच्या विळख्यात अडकलेल्या तेरा वर्षाच्या अल्पवयीन शाळकरी मुलास अखेर बार्शी डेपोच्या वाहक व वैराग पोलिसांच्या मदतीने पालकांच्या ताब्यात देण्यात आले. ही घटना बार्शी-सोलापूर बसमध्ये घडली. वैराग बस डेपोमध्ये मुलाला उतरवून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
याबाबत घडलेली सविस्तर माहिती अशी की, वैराग बस स्थानकावर बार्शीवरून सोलापूरकडे जाणाऱ्या बसमध्ये एक तेरा वर्षीय अल्पवयीन शाळकरी मुलगा लपून बसला होता. एस टी बसचे वाहक सचिन दुबे यांना तो आढळून आला. त्यांनी त्या मुलाची चौकशी केली असता, तो बार्शी येथील रहिवासी असून सातवीमध्ये शिकत असल्याचे त्यांना कळाले.
वाहक दुबे यांनी वैराग पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल सचिन मुंडे यांच्या मदतीने त्या मुलाला वैराग पोलिसांच्या ताब्यात दिले. दरम्यान ठाणे अंमलदार उमेश कंगले व पोलीस कॉन्स्टेबल श्रीमंत शिंगाडे यांनी मुलाला विश्वासात घेवुन त्याला बोलण्यात गुतवून ठेवले. मुलाने पोलिसांकडे व्हेज मंचुरियन, खवा व भेळ खाण्याचा हट्ट केला आणि तो पोलिसांनी देखील पुरविला.
त्या दरम्यान पोलिसांनी हा मुलगा सापडला असल्याची कल्पना त्याच्या पालकांना दिली. पालकांनी वैराग पोलीस स्टेशन येथे सायंकाळी आठच्या सुमारास येवुन मुलास ताब्यात घेतले. बस वाहकाच्या जागरूकतेमुळे व वैराग पोलिसांच्या प्रसंगावधानतेमुळे हा मुलगा सुखरूप पालकांच्या ताब्यात देण्यात आला.
या प्रकारामुळे मोबाईल गेमच्या आहारी जावून चक्रव्युहात अनेक अल्पवयीन मुले गुंतली असून, पालकांनी वेळीच दक्षता घेऊन शाळकरी मुलांची काळजी घ्यावी.कुंदन गावडे पोलिस निरीक्षक वैराग