Dnyaneshwar Maharaj Palkhi Sohala 2026 
सोलापूर

Dnyaneshwar Maharaj Palkhi Sohala 2026 : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे हरिनामाच्या गजरात सोलापूर जिल्ह्यात आगमन

माऊली..., माऊलीच्या...जोरदार गजराने आसमंत दुमदुमला...

पुढारी वृत्तसेवा

सुनिल गजाकस

नातेपुते : बरड येथील पहाटेच स्नान व आरती करून पंढरपुरीच्या दिशेने मार्गक्रमण करण्यासाठी सोलापूर जिल्ह्याच्या सरहद्दीत संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे हरिनामाच्या गजरात रविवारी (दि.१९) सकाळी १० वा. आगमन झाले. यावेळी धर्मपुरी ग्रामस्थांनी  २०० किलो गुलाबाच्या फुलांच्या पाकळ्यांची पुष्पवृष्टी केली. यावेळी सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील व जिल्हा पोलिस अधिक्षक निखील पिंगळे यांनी पालखीला निरोप दिला.

एकच चैतन्य, एकच ब्रह्म भरून राहिले आहे. हे सिद्ध करण्यासाठी ज्ञानोबांनी रेडय़ाला वेदघोष करायला सांगितलं. ‘रेडयामुखी वेद बोलविला, गर्व द्विजांचा हरविला, शांतिरूपे प्रकटला ज्ञानोबा माझा..’ या ज्ञानोबांवर सर्व संतांनी, सर्व वैष्णव भक्तांनी खूप प्रेम केले. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांचा महिमा अगाद आहे. विटेवर उभ्या असलेल्या सावळ्या विठुरायाला केव्हा भेटेन या उत्कट ओढीने ऊन, वारा, पावसाची तमा न बाळगता अलंकापुरीहून आलेल्या संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोबत लाखो वैष्णवांची मांदियाळी अखंड हरिनाम घेत झपझप पावले उचलत असून, या सोहळ्याने (दि.१९) सकाळी १० वाजता सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केला.

सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवर धर्मपुरी येथे तोफांच्या सलामीत पोलीस बेंजो पथकाने पारंपारिक संगीत वाद्यांच्या सलामीत सोहळ्याचे स्वागत जिल्ह्याचे जिल्हाधिकारी एस कार्तीकेय माळशिरस चे आमदार उत्तमराव जानकर, माजी विधानपरिषद सदस्य  रणजितसिंह मोहिते पाटील  , जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, सोलापूर जिल्हा अधिक्षक अतुल कुलकर्णी यांनी संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पादुका चे पुजन करून दर्शन घेतले.  यावेळी माऊली..., माऊलींचा...जोरदार गजराने आसमंत दुमदुमत होता. टाळमृदंगाचा टिपेला पोहोचलेला नाद आणि जोडीला हातातील भगवी पताका उंचावत तल्लीन नाचणाऱ्या वारकऱ्यांच्या जोशात वातावरणातील गारवा अंगावर झेलत दंग झालेला वैष्णवांचा मेळा. सर्वात पुढे चौघडा, त्यामागे अश्व व २७ दिंडया, त्यानंतर माऊलींचा विविध फुलांनी सजवलेला रथ आणि त्यामागे २५० पेक्षाही अधिक दिंडयांचा दळभार टाळ, मृदुंगाचा गजर व हरिनामाचा जयघोष करत मोठया उत्साही व भक्तीमय वातावरणात धर्मपुरी येथे सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवर स्वागत सोहळाच स्वागत करण्यात आले. रथाला तोरणे, लडया, गोंडे आदींची सजावट करण्यात आली होती. त्यासाठी मोगरा, झेंडू यांसह वेगवेगळ्या फुलांचा वापर करण्यात आला होता. 

 "!! ध्यास हा जिवाला, पंढरीशी जावू, पंढरीचा राणा डोळे भरुन पाहू..." या उक्तीचा प्रत्यय आज येत होता. 

माझे जीवीची आवडी। पंढरपुरा नेईन गुढी॥ 

पांडुरंगी मन रंगले। गोविंदाचे गुणी वेधीले॥ 

– श्री ज्ञानेश्वर महाराज 

पालखीच्या स्वागतासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी एस  कार्तीकेय ,माजी विधानपरिषद सदस्य रणजित सिंह मोहिते पाटील,माजी आ.रामहरी रूपनवर, माळशिरस चे आमदार उत्तमराव जानकर,माजी आमदार राम सातपुते जिल्हा प्रशासन , जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी,  प्रांताधिकारी  विजया पांगारकर, तहसीलदार सुरेश शेजूळ, नायब तहसीलदार अमोल कदम, मंडळ अधिकारी चंद्रकांत लोखंडे, धर्मपुरी चे माजी सरपंच बाजीराव काटकर,गटविकास अधिकारी रघुनाथ पांढरे , उपविभागीय अधिकारी पोलीस अधीक्षक संतोष वाळके,नारायण शिरगावकर,सपोनि विशाल वायकर, महावितरण जिल्हा अधीक्षक अभियंता सुनिल माने ,माजी ,तसेच सर्वच विभागाचे प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. 

माऊलीच्या पालखीचा विसावा न्याहरीसाठी कारूंडे बंगला या ठिकाणी थांबून पालखी सोहळा नातेपुतेकडे मार्गस्थ होत सायंकाळी ५.वा वैष्णवांचा मेळा नातेपुते नगरीत सोलापूर जिल्ह्यातील पहिल्या मुक्काम ठिकाणी विसावला. यावेळी नातेपुते नगरपंचायत व ग्रामस्थांनी पुष्पवृष्टी करून पालखी सोहळ्याचे स्वागत केले. 

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा मध्ये वारी मार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा यासाठी मोठा विस्तीर्ण महामार्ग तयार करण्यात आला आहे परंतु केवळ पोलीस प्रशासनाने योग्य नियोजन न केल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली व मोठ्या प्रमाणात कोंडी निर्माण झाली. पालखी स्वागतासाठी आलेले जिल्हाधिकारी व अन्य अधिकारी व लोकप्रतिनिधी यांनाही पायी स्वागत मंडपापर्यंत  जावे लागले. त्यांनाही कोंडीचा सामना करावा लागला.पोलिस प्रशासनाचे ढिसाळ कारभारामुळेच वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. या मार्गावर आपात्कालीन रुग्णवाहिका ही वाहतूक कोंडीत अडकल्याचे पहायला मिळाले. 

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाने सोहळ्यासाठी सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. वैष्णव भक्तांची वारी स्वच्छ व निर्मल व सुरक्षित व स्वयंशिस्त वारी असते प्रशासनाचे पावसामध्ये वैष्णव भक्तांची निवाऱ्याची गैरसोय होऊ नये म्हणून ठिकठिकाणी जर्मन मंडप टाकण्यात आले आहेत. शासनाच्यावतीने स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सोय तसेच स्वच्छता गृह अनेक ठिकाणी उभारण्यात आली आहेत. याचा वारकऱ्यांनी लाभ घ्यावा. 
विजया पांगारकर माळशिरस तालुका प्रांताधिका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT