सोलापूर ः पुढारी वृत्तसेवा
मूळ अंदाजपत्रकातून सुटलेल्या ‘जलजीवन’ मिशनच्या 130 कामांना मंजुरी देण्यात येणार आहे. ही कामे जिल्ह्यातील वाड्या-वस्त्यांवर होणार आहेत. त्यामुळे या भागातील नागरिकांची पायपीट थांबणार आहे. जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून जिल्ह्यात एक हजार नऊ ‘जलजीवन’ची कामे सुरू आहेत. त्याचा सुधारित आराखडा तयार करण्यात आला असून यामध्ये 130 कामांना मंजुरी देण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील लहान-मोठ्या गावांत ‘जलजीवन’च्या कामांना मंजुरी दिली होती. तरीही अनेक वाड्या-वस्त्या या योजनेपासून वंचित राहिल्या होत्या. त्याचा आराखडा कनिष्ठ अभियंत्यांनी तयार केला आहे. त्यांच्याकडून सुधारित आराखडा जिल्हा परिषदेकडे येणार आहे. त्यानंतर त्या कामांना मंजुरी देण्यात येणार असल्याची माहिती ग्रामीण पाणीपुरवठ्याचे कार्यकारी अभियंता संजय धनशेट्टी यांनी दिली आहे. दरम्यान, जिल्ह्यातील अनेक गावांत ‘जलजीवन’च्या कामांची गरज नसताना ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून मंजुरी दिली. जेेथे कामांची गरज आहे तेेथे कामे मंजूर केली नसल्याचा आरोप सरपंचांनी मध्यंतरी केला होता. त्यानंतर ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने ज्याठिकाणी अत्यंत कामाची गरज आहे अशाठिकाणी ही कामे मंजूर केली आहेत. त्यामुळे त्या गावांना ‘जलजीवन’ मिशन योजनेचा फायदा होणार आहे.
जलजीवन मिशन अंतर्गत जिल्ह्यात एक हजारापेक्षा जास्त कामे सुरू आहेत. या योजनेंतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक कुटुंबाला पाणी मिळावे हा उद्देश आहे. ही योजना पुढील पंचवीस ते तीस वर्षांच्या लोकसंख्येचा अंदाज घेऊन केली आहे. त्यामुळे मूळ अंदाजपत्रकातून सुटलेल्या सुधारित कामांना मंजुरी देण्यात येणार आहे.- संजय धनशेट्टी, कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग