World Paralysis Day Special
जागतिक पक्षाघात दिन विशेष Pudhari File Photo
सोलापूर

वाढत्या तणावामुळे पंचविशीतच उद्भवतोय पक्षाघात

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : दिवसेंदिवस प्रत्येकाची जीवनशैली आणि वाढत्या ताण-तणावामुळे सत्तर-पंचाहत्तरीतला पक्षाघात अर्थात पॅरालिसिस आता पंचविशीतच डोके वर काढू लागला आहे. छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय येथे दिवसाला दोन ते तीन, तर महिन्याकाठी 100 रुग्ण पक्षाघाताचे येत आहेत. त्यामुळे सकस आहार व दररोज व्यायाम करणे गरजेचे असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले. दरम्यान, बदलत्या जीवनशैलीमध्ये आपण आपल्या मेंदूची काळजी घेणे आवश्यक आहे. आपले न्यूरोलॉजिकल नेटवर्क जितके भक्कम आहे, तितकेच आपले आरोग्य व्यवस्थित मानले जाते. यामुळे पक्षाघात संदर्भात जगभरामध्ये जनजागृती करण्यासाठी जागतिक पक्षाघात निवारण दिन दरवर्षी 24 जूनला साजरा केला जातो. त्या संदर्भात घेतलेला हा आढावा.

जगात दर दोन सेकंदाला एक, तर देशात दर दोन मिनिटाला सहा लोकांना पक्षाघात होत असून याकडे गांभीर्याने पाहणे आता गरजेचे बनले आहे. पक्षघाताच्या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता वेळीच उपचार घेतल्यास 60 ते 65 टक्के रुग्णांचा जीव वाचवू शकतो, असेही वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले. दरम्यान, मेंदूमध्ये ऑक्सिजन आणि पोषक द्रव्य घेऊन जाणारी रक्तवाहिनी गुठळ्यांद्वारे अवरोधित होते किंवा फुटते, त्यावेळी पक्षाघात होतो. अशा स्थितीत 80 टक्के रुग्णात रक्तवाहिनी बंद होते, तर 20 टक्के रुग्णांमध्ये रक्तवाहिनी फुटते. यामुळे पक्षाघाताची लक्षणे दिसताच लवकरात लवकर मेंदू तज्ज्ञांशी संपर्क साधल्यास त्या रुग्णाचा जीवदेखील वाचण्याची शक्यता असते.

पक्षाघाताचे दोन प्रकार

1. रक्ताच्या गुठळ्या निर्माण झाल्याने इस्केमिक स्ट्रोक येतो. पक्षाघाताच्या एकूण प्रकरणांपैकी 70 ते 80 टक्के प्रकरणे इस्केमिक स्ट्रोकची असतात.

2. रक्तवाहिन्या फुटल्यावर रक्त वाहून जाते आणि त्यामुळे हेमोराजीक स्ट्रोक येतो. रक्तवाहिन्या फुटल्याने किंवा रक्तवाहिन्यांचा कमकुवत भाग बाहेर आल्याने पक्षाघात होतो.

पक्षाघाताची लक्षणे

तोंड वाकडे होणे, हात-पाय न उचलणे, चक्कर येणे, बोलताना जीभ जड होणे, गिळण्यास त्रास होणे, समोरचे काही न दिसणे, चालताना अडखळणे.

या रुग्णांनी घ्यावी काळजी

उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तींना पक्षघाताचा अधिक धोका असतो. तसेच लठ्ठपणा, उच्च कोलेस्ट्रॉल, विटॅमिन बी-12 ची कमतरता, मधुमेह तसेच मद्यपान करणार्‍यांनादेखील या आजाराचा अधिक धोका असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.

SCROLL FOR NEXT