Pune Solapur Highway Collision One Dead
मोडनिंब : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर सापटणे (ता. माढा) गावाच्या हद्दीत एच.पी. पेट्रोल पंपाजवळ सोमवारी (दि. २१) दुपारी बाराच्या सुमारास स्कॉर्पिओने कंटेनरला पाठीमागून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात स्कॉर्पिओमधील तिघे तरुण गंभीर जखमी झाले. त्यापैकी कर्ण महेश पवार (वय २३, रा. मोहोळ) याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, स्कॉर्पिओ (क्र. एमएच ४२ बीएन ५११२) ही मोहोळहून टेंभुर्णीकडे जात होती. सापटणे गावाच्या हद्दीत एच.पी. पेट्रोल पंपाजवळ पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनर (क्र. टीएस ०८ यूबी ४४७८) ला स्कॉर्पिओने पाठीमागून जोरदार धडक दिली. धडकेनंतर स्कॉर्पिओचा पुढील भाग कंटेनरखाली अडकला. त्यामुळे वाहनाचा पुढील भाग मोठ्या प्रमाणात क्षतिग्रस्त झाला आणि कारमधील तिघे तरुण वाहनातच अडकून पडले.
अपघाताची माहिती मिळताच वरवडे टोलनाका येथील गस्ती पथक तसेच मोडनिंब महामार्ग पोलिस मदत केंद्राचे अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. वरवडे टोलनाका येथील क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त स्कॉर्पिओ कंटेनरखालून बाजूला काढण्यात आली. त्यानंतर स्कॉर्पिओचे दरवाजे तोडून जखमी तरुणांना बाहेर काढण्यात आले.
जखमींपैकी दोघांना वरवडे टोलनाका येथील रुग्णवाहिकेतून डॉ. प्रशांत कारंजकर व रुग्णवाहिकाचालक सागर फाटे यांच्या मदतीने टेंभुर्णी येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तर एका गंभीर जखमी तरुणाला वेणेगाव येथील जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान, नानिजधाम यांच्या रुग्णवाहिकेतून टेंभुर्णी येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
या अपघातात तिघांना डोके, छाती, हात, पाय व पोटाला गंभीर दुखापत झाली होती. जखमींमध्ये अनिकेत लक्ष्मण धोत्रे (वय २३), रोहित विजय मोरे (वय २१) आणि कर्ण महेश पवार (वय २३), सर्व रा. मोहोळ, यांचा समावेश आहे. उपचारादरम्यान कर्ण महेश पवार याचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली.
अपघाताची माहिती मिळताच वरवडे टोलनाका गस्ती पथकाचे प्रमुख संतोष खडके, चालक अभिजीत गुजरे, सहाय्यक नवनाथ मोरे तसेच मोडनिंब महामार्ग पोलिस मदत केंद्राचे अधिकारी किरण आवताडे (पीएसआय), पो. हे. सचिन आतकर, पो. ना. सुनील माने, पो. हे. कॉ. हनुमंत चौधरी आणि पो. हे. कॉ. पांडुरंग जगताप यांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले.
दरम्यान, या अपघाताची माहिती वरवडे टोलनाका गस्ती पथकाचे प्रमुख संतोष खडके यांनी टेंभुर्णी पोलिस ठाण्यातील अपघात विभागाचे अधिकारी जगताप यांना दिली असून, पुढील तपास पोलिस करीत आहेत.