

सोलापूर : माळशिरस तालुक्यातील लवंग येथे वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी आणि गणेशवगाव येथील नऊ शेळ्या-बोकड चोरीच्या दोन स्वतंत्र गुन्ह्यांचा स्थानिक गुन्हे शाखेने छडा लावला. या दोन्ही गुन्ह्यांत प्रत्येकी तीन आरोपींचा सहभाग असल्याचे तपासात समोर आले असून पोलिसांनी दोन्ही प्रकरणांत प्रत्येकी एका आरोपीला ताब्यात घेतले आहे.
चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्यातील आरोपीकडून २१ हजार किंमतीचे १.८ ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले. लवंग येथे ७ सप्टेंबर रोजी रात्री पडवीत झोपलेल्या वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याच्या मण्या व कर्णफुले चोरीला गेली होती. तपासादरम्यान गोपनीय बातमीदारामार्फत टिल्ल्या ऊर्फ तेजस सोमनाथ जाधव, अर्जुन विजय चव्हाण व करण महादेव चव्हाण यांनी हा गुन्हा केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तेजस जाधव हा चोरीचे सोने विकण्यासाठी अकलूजला येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर सहायक पोलिस निरीक्षक विशाल मुळे यांच्या पथकाने कर्मवीर चौकात सापळा रचला.
तेजस पायी येताना दिसताच त्याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली.गणेशवगाव येथील चार शेळ्या व पाच बोकड चोरीच्या तपासात दीपक रामा काळे, प्रल्हाद बाबू काळे व नितीन सरदार चव्हाण यांची नावे समोर आली. यातील दीपक काळे हा अकलूजच्या विजय चौकात येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तेथे सापळा रचला. तेथे त्याला ताब्यात घेण्यात आले.
ही कारवाई पोलिस निरीक्षक संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक विशाल मुळे यांच्या पथकाने केली. यात मनोज भंडारी, पंकज महिंद्रकर, सिद्धाराम कंटोळी, व्यंकटेश मोरे यांचा समावेश आहे.
पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलिस अधीक्षक विजय कबाडे, अप्पर पोलिस अधीक्षक प्रेरणा कट्टे आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक विशाल मुळे यांच्या नेतृत्वाखाली पोलिस हवालदार मनोज भंडारी, पंकज महिदकर, सिद्धराम कंटोळी, व्यंकटेश मोरे, तसेच पोलिस कॉन्स्टेबल राहुल दोरकर, हरीश थोरात व बाळराजे घाडगे व पथकाने केली.