सोलापूर ः फलटण येथील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेला पीएसआय गोपाळ बदनेवर सोलापुरातही एका महिलेने अत्याचाराचे आरोप केले होते. याबाबत पोलीस आयुक्तालयात बदनेची चौकशी झाली; मात्र पुढे काहीच झाले नाही. बदने हा सोलापूर शहर पोलीस दलात भरती झाला असून, दहा वर्षे त्याने सोलापुरात अंमलदार पदाची सेवा बजावली आहे.
बदने याच्यावर आत्महत्या केलेल्या तरुणीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. घटनेच्या दोन दिवसांनंतर तो पोलिसांना शरण आला. त्यानंतर बदने याच्या कारकिर्दीची चर्चा राज्यभर सुरू झाली. शहर वाहतूक शाखेत काम करताना त्याच्यावर एका महिलेने अत्याचाराचा आरोप केला होता. याबाबत पोलीस आयुक्तालयातील तत्कालीन वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे त्या महिलेने अर्ज करीत बदने याच्यावर कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर त्या अर्जाचा तपास एका वरिष्ठ महिला अधिकाऱ्यावर सोपविण्यात आला; परंतु नंतर तक्रार दिलेल्या महिलेनेच केस माघारी घेतल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
बदनेची भरती सोलापुरात
बदने हा 2013 साली सोलापूर शहर पोलीस दलात भरती झाला. पोलीस मुख्यालयानंतर त्याने आरसीपी म्हणजेच दंगा नियंत्रण पथकात काम केले. त्यानंतर त्याची बदली शहर वाहतूक शाखेत झाली. वाहतूक शाखेत कार्यरत असतानाच त्याने पोलीस प्रशासनातील अंतर्गत परीक्षा दिली. 1 एप्रिल 2023 रोजी त्याची पीएसआय म्हणून निवड झाली. नाशिक येथे प्रशिक्षण कालावधी त्याने पूर्ण केला. त्यानंतर त्याची पोस्टिंग सातारा येथे झाली. सोलापुरात त्याने 10 वर्षे पोलीस अंमलदार म्हणून सेवा बजावली.