Tembhurni Lodge Raid
टेंभुर्णी : टेंभुर्णी पोलिसांनी येथील जंजिरा हॉटेल व लॉजवर धाड टाकत कुंटणखान्यावर कारवाई करून चार जणांना अटक केली असून तीन महिलांची सुटका केली आहे. ही कारवाई सोमवारी करण्यात आली.
या कारवाईत अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे सौदागर हणुमंत क्षीरसागर व लहु उर्फ डॉन क्षीरसागर (रा. शिडसिंगे, ता. माढा), तुषार अशोक मिसाळ (वय २२, रा. वाघोली, ता. माळशिरस), राहुल बाबासाहेब जाधव (वय २९, रा. सातमाने, रावळगाव, ता. मालेगाव, जि. नाशिक) आणि सोमनाथ संभाजी शिंदे (वय २४, रा. निमगाव टें., ता. माढा) अशी आहेत.
टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांना गोपनीय माहितीगारामार्फत माहिती मिळाली होती की, जंजिरा हॉटेलमध्ये बाहेरील गावांतील महिलांना आणून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करवून घेत कुंटणखाना चालविला जात आहे.
मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी पोलिस पथक, पंच व डमी ग्राहकांच्या मदतीने सापळा रचला. या कारवाईदरम्यान चार तरुण आणि तीन महिला आढळून आल्या. तपासात सदर ठिकाणी आरोपी हे लॉजच्या आड वेश्या व्यवसाय चालवून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी कुंटणखाना चालवत असल्याचे निष्पन्न झाले.पोलिसांनी घटनास्थळावरून गांजाने भरलेल्या प्लास्टिक पिशव्या व रोख रक्कम असा एकूण सुमारे १,९०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या प्रकरणी महिला पोलीस उपनिरीक्षक स्वाती सुरवसे यांनी फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर व करमाळा विभागाच्या सहाय्यक पोलीस अधीक्षक अंजना कृष्णा व्ही. एस. यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या पथकात पोलीस निरीक्षक नारायण पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश चौधरी, महिला पोलीस उपनिरीक्षक स्वाती सुरवसे, पोलीस उपनिरीक्षक विलास रणदिवे यांच्यासह पोलीस कर्मचारी सहभागी होते.
सर्व अटक आरोपींना माढा येथील प्रथम वर्ग न्यायालयात हजर केले असता, प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी अनय कुलकर्णी यांनी चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात सरकारी वकील म्हणून कोकणे यांनी काम पाहिले. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक नारायण पवार करीत आहेत.
दरम्यान, टेंभुर्णी हे हायवेवरील शहर असून येथे लॉजची संख्या मोठी आहे. विविध राज्यांतील कामगार वर्ग मोठ्या प्रमाणावर असल्याने काही लॉजच्या आड छुपे बेकायदेशीर व्यवसाय सुरू असल्याच्या चर्चा खाजगीत होत असून, अशा प्रकारांवर पोलिसांनी कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.