

नरखेड : मोहोळ-वैराग राज्य मार्ग क्र.141 या रस्त्यावरील मलिकपेठ (ता. मोहोळ) येथील रेल्वेच्या भुयारी मार्गावरील सिमेंट काँक्रिटचे निकृष्ट काम धोकादायक झाले आहे. या रस्त्यामधून तीन फुटांच्या लोखंडी सळ्या बाहेर आल्या आहेत. या सळ्या टायरमध्ये घुसून मोठ्या अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे.
येथून प्रवास करणारे शेकडो प्रवासी आपला जीव मुठीत धरून प्रवास करीत आहेत. निकृष्ट दर्जाच्या कामामुळे लोखंडी सळ्या सिमेंट काँक्रेटमधून बाहेर आल्या आहेत. मात्र रेल्वे प्रशासनाचे याकडे ना लक्ष, ना दखल, त्यामुळे रेल्वे प्रशासनाचा हलगर्जीपणा दिसून येत आहे.
मोहोळ - वैराग राज्य मार्गावरील मलिकपेठ येथील रेल्वेमार्गावर (गेट क्रमांक 46/ए) हा भुयारी मार्ग आहे. येथून ये जा करणाऱ्या वाहनांच्या टायरमध्ये या लोखंडी सळ्या घुसू शकतात. यातूनच मोठा अपघात होण्याची शक्यता येथे निर्माण झाली आहे.
या कामात ठेकेदाराचा हलगर्जीपणा व प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने मलिकपेठ, नरखेड, देगाव , वाळूज , एकूरके , बोपले , डिकसळ , मसलेचौधरी , घाटणे भोयरे तसेच येथून बार्शी व वैराग भागातून ये जा करणाऱ्या नागरिकांमध्ये संताप पसरला आहे. रेल्वे प्रशासनाने याची दखल घेऊन तत्काळ दुरुस्ती करावी अशी मागणी वाहन चालक ,प्रवाशी व ग्रामस्थांमधून होत आहे.
भूयारी मार्गाच्या काँक्रीटच्या भिंतचे काम काही ठिकाणी अपूर्ण अवस्थेत आहे. लोखंडी सळया उघड्या असल्याने गंज चढू लागला आहे.रस्त्यावरील क्राँक्रीटीकरण ही सपाट नसून जागोजागी चढउतार आणि खाचा पडल्या आहेत त्यामुळे वाहने आदळत आपटत जात आहेत.
प्रवाश्यांचा मणका न मणका खिळखिळा होत आहे. पावसाळ्यात भूयारी मार्गावरील पाण्याचा निचरा नीट होत नसल्याने येथे गुडघाभर पाणी साठून राहत मागील अनेक वर्षापासून अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.