बार्शी : दक्षिण मध्य रेल्वेने तिरुपती-पंढरपूर ही एक्स्प्रेस कुर्डूवाडी- बार्शी-धाराशिव-लातूर मार्गे सुरू केली आहे. ही साप्ताहिक गाडी दर शनिवारी सायंकाळी तिरुपती येथून 4:40 वा. निघेल आणि ती दुसऱ्या दिवशी बार्शीत सायंकाळी 5 तर पंढरपूर येथे सायंकाळी 6:50 वाजता पोहोचणार आहे. पंढरपूर येथून दर रविवारी रात्री 8 वाजता निघेल आणि बार्शीत रात्री 9:30 वाजता तर तिरुपतीला दुसऱ्या दिवशी रात्री 10:30 वाजता पोहोचणार आहे.
या तिरुपती पंढरपूर एक्स्प्रेसला रेनिगुंठा, राजमपेटा, ओंटीमिट्ट, कडपा, येरगुंटाला, ताडीपत्री, गुटी, डोन, कर्णली सिटी, गडवाल, वनपर्ती रोड, मेहबूबनगर, जडचर्ला, शादनगर, उमदानगर, काचीगुडा, सिकंदराबाद, बेगमपेठ, लिंगमपल्ली, शंकरपल्ली, विकाराबाद, जहिराबाद, बिदर, भालकी, उदगीर, लातूर रोड, लातूर, धाराशिव, बार्शी टाऊन, कुर्डूवाडी व मोडनिंब हे थांबे असणार आहेत. या गाडीमुळे दक्षिणेतील भक्तांना पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेणे सोयीचे होणार आहे. अनेकांना पंढरपुरात दर्शन करुन तिरुपतीला दर्शनासाठी जाता येणार आहे.