पंढरपूर : ऊस तोडणी मजुरांची टोळी घेऊन निघालेल्या ट्रॅक्टरला भरधाव कंटेनरने समोरून धडक दिली. या झालेल्या अपघातात दोन्ही वाहने पुलावरून थेट भीमा नदीपात्रात कोसळली. रविवारी (दि. 11) रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास पंढरपुरात घडलेल्या या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर सात जण जखमी झाले आहेत. या अपघातात महादेव दिलीप काळे, राजू रमेश चव्हाण अशी ठार झालेल्यांची नावे आहेत. अपघातातील सर्वजण जळोली, करकंब परिसरातील आहेत.
अपघातात महादेव दिलीप काळे (वय 50, रा. जळोली) आणि राजू रमेश चव्हाण (वय 40, रा. करकंब) अशी मृतांची नावे आहेत. तर जखमींमध्ये लक्ष्मण राजेंद्र चव्हाण (वय 38), सुवर्णा ज्ञानेश्वर पवार (वय 45), अनिता भारत काळे (वय 19), विनोद सुखदेव गोमटे (वय 30), नाना हनुमंत काळे (वय 32), देवा राजेंद्र चव्हाण (वय 8), राजेंद्र चव्हाण (वय 4), ब्रिजेश कुमार (वय 35) यांचा समावेश आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, करकंब येथील दिनेश दगडू देशमुख यांचा ट्रॅक्टर कर्नाटकात ऊस तोडणीच्या कामासाठी गेलेला होता. बेळगी कर्नाटक येथे तीन महिने ऊस तोडणी केल्यानंतर पुन्हा दहा मजुरांची टोळी घेऊन हा ट्रॅक्टर रविवारी रात्री पुन्हा करकंबकडे परत येत होता. यादरम्यान पंढरपूर येथील भीमा नदीवरील नवीन पुलावर समोरून भरधाव आलेल्या कंटेनरने (क्र. डी.डी. 03 / पी.9617) ट्रॅक्टरला जोरात धडक दिली.
हा अपघात इतका भीषण होता की, अपघातग्रस्त दोन्ही वाहने पुलावरून थेट नदीपात्रात एकावर एक कोसळली. ही दोन्ही वाहने मातीच्या ढिगावर पडली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. सर्व जखमी येथील उपजिल्हा रुग्णाल उपचार सुरू आहेत. पोलिस व अग्नीशमन विभागाने, तसेच महसूल विभागाने शर्थीचे प्रयत्न करुन अपघातग्रस्तांना मदत करत बाहेर काढले. याबाबत नाना हणमंत काळे यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे.