सोलापूर

सोलापूर: पापरी येथील महादेव मंदिरात महाशिवरात्री यात्रेची तयारी पूर्ण

दिनेश चोरगे

पापरी; पुढारी वृत्तसेवा :  सोलापूर जिल्ह्यातील पापरी (ता.मोहोळ) येथे एकमेव 'स्वयंभु' महादेवाचे लिंग असून ते पापरी आणि पंचक्रोशित प्रसिद्ध आहे. या ठिकाणी भविकांची नेहमी वर्दळ असते. महाशिवरात्रीनिमित्त मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी होत आहे. या पार्श्वभूमीवर मंदिर प्रशासनाच्या वतीने अनेक उपाययोजना करण्यात येत आहे.

या 'स्वयंभू' महादेवाच्या लिंगाबद्दल गावातील वयोवृद्ध नागरिक आणि शिवभक्तांकडून एक आख्यायिका सांगितली जाते. पूर्वी संस्थान काळात पापरी, खंडाळी (ता.मोहोळ) परिसरात खटवांग राजाचे संस्थान होते. या राजास शिकारीचा छंद होता. तो दररोज जंगलात शिकारीस जात असे. या राजास कोणतेही अपत्य नव्हते. एकेदिवशी राजा नेहमीप्रमाणे शिकारीस गेला असता खूप वेळ फिरूनही शिकार मिळाली नसल्याने तो थकला होता. थकल्यामुळे तो जंगलातील एका कडुलिंबाच्या झाडाखाली बसला. त्याला तेथेच झोप लागली. झोपेत त्याला महादेवाचा दृष्टान्त झाला. "राजा तू झोपला आहेस तिथे माझे अस्तित्व आहे. माझ्या डोक्यावर सावली कर तुझा वंश वाढेल, तुला अपत्य होईल" राजाने उठल्यावर त्या खड़काकडे नीट पाहिले तर तेथे स्वयंभू महादेवाचे लिंग दिसले. जे सध्याही अस्तित्वात आहे. राजाने तत्काळ तेथे ६, ७ खनाची इमला रूपी खोली बांधली. व त्या स्वयंभू महादेव लिंगावर सावली केली. नंतर काही दिवसांनी त्याला अपत्य झाले.

या मंदिराचे भव्य असे बांधकाम करण्यात आले असून महाशिवरात्री निमित्त येथे हरिनाम व शिवलिलामृत ग्रंथ पारायण सप्ताहाचे  23 वर्षापासून आयोजन करण्यात येते. महाशिवरात्रीला मंदिर परिसरात मोठी यात्रा भरते. मोहोळ तालुक्यातील विविध गावातील तसेच पुणे, औरंगाबाद, सोलापूर, कर्नाटक परिसरातून मोठ्या संख्येने भाविक येत असतात. पापरी गावापासून हे महादेव मंदिर 3 किमी अंतरावर आहे. तर सोलापूर-पुणे या राष्ट्रीय महामार्गावरील देवडी फाट्यावरुन 2 किमी अंतरावर आहे. महाशिवरात्रीला आलेल्या भविकांची सोय व्हावी, यासाठी लोकवर्गणीतून ग्रामस्थानी भव्य असे येथे पत्राशेड उभारले आहे.

सप्ताह निमित्ताने घडते गावातील सामाजिक एकोप्याचे दर्शन

या 'स्वयंभू' मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त ग्रामस्थांतर्फे हरिनाम सप्ताह आयोजित केला जातो. या सप्ताह काळात विविध जाती – धर्माचे लोक एकत्रित येवून स्वयंभू महादेवाची पूजा करतात. ग्रामस्थांच्या वतीने सप्ताहाला अन्नदानाची व्यवस्था केली जाते. तसेच महाशिवरात्रीला भाविकांसाठी उपवासाच्या खिचडीचेही वाटप करण्यात येते. सध्या मंदिरात आणि गाभाऱ्यात महाशिवरात्री निमित्त फुलांची सजावट करण्यात येत आहे.

           हेही वाचलंत का ? 

SCROLL FOR NEXT