Irrigation Water Loss Solapur
पिलीव: माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील ब्रिटीशकालीन १९२० साली बांधकाम झालेल्या निरा उजवा कालव्याला आज (दि.६) पहाटे पाचच्या सुमारास भगदाड पडले. आठ मोरीजवळील दक्षिणेकडील भिंतीचे २००७ ते २००८ च्या दरम्यान ठेकेदाराने एका भिंतीचे काम अपूर्ण ठेवून बांधकाम केले नव्हते. त्याच भिंतीला भगदाड पडले आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात लाखो लिटर पाणी वाया गेल्याने शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे.
भळ बुजविण्याचा अधिकाऱ्यांकडून दोन दिवस आटोकाट प्रयत्न सुरू होते. सिमेंट, फिकसेट व इतर साहित्य वापरुन बुजविले होते. मात्र, आज पहाटे भिंत पाण्याचा दाबामुळे खचून कोसळली. यामुळे लाखो लिटर पाणी ओढयात वाहून गेले आहे. पाणी झिंजेवस्ती मळोली, शेंडेचिंच पर्यत ओढयात लाखो लिटर पाणी वाहून गेले आहे. अधिकाऱ्यांनी खुडुस येथील ७७ चौकी व त्या वरील सर्व फाट्यांना पाणी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. सहा तासांत पाणी बंद होईल, त्यानंतर युद्ध पातळीवर कालव्याची दुरूस्ती करण्यात येणार असल्याचे वेळापूरचे शाखा अभियंता दिनेश राऊत यांनी सांगितले.
फलटणचे कार्यकारी अभियंता शिवाजी जाधव यांनी घटनास्थळी भेट देऊन अधिकाऱ्यांना सुचना दिल्या आहेत. प्रांताधिकारी, तहसीलदार, संबंधित गावचे तलाठी, ग्रामसेवक यांना सुचना देण्यात आल्या आहेत. ओढ्या लगतच्या नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. सांगोला, पंढरपूर, मंगळवेढा तालुक्यातील पाण्यापासून वंचित असणाऱ्या शेतकऱ्यांना पाणी देण्याचा प्रयत्न केला जाईल, असे दिनेश राऊत यांनी सांगितले. यावेळी ग्राम महसुली अधिकारी अमोल कांबळे, मंडळ अधिकारी विजय एखतपुरे, पोलीस नाईक सतीश धुमाळ, अमित जाधव यांनी घटनास्थळी भेट दिली.
निरा उजवा कालवा फुटीबाबत वेगवेगळे तर्क वितर्क लावले जात आहेत. मात्र, याठिकाणी २००७-२००८ मध्ये आठ मोरीच्या मजबुतीकरण काम करताना ठेकेदाराने दक्षिण बाजुच्या भिंतीचे काम न केल्यामुळेच ही घटना घडली आहे. त्यामुळे ठेकेदाराची चौकशी करून दुरूस्तीचा खर्च वसूल करण्यात यावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.