

सोलापूर : उन्हाची तीव्रता वाढल्याने जिल्ह्यातील पाणी पातळी खालावली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील 16 गावांमध्ये 17 टँकरद्वारे 30 हजार लोकांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे. गतवर्षी जिल्ह्यात चांगला पाऊस झाला आहे. यंदा एप्रिलमध्ये टँकरची संख्या घटली. माळशिरसमध्ये 12 गावात 12 टँकरने पाणीपुरवठा होत आहे. मंगळवेढा तालुक्यात एक, दक्षिण सोलापूर तालुक्यात एक आणि अक्कलकोट तालुक्यात तीन अशा 17 टँकरने पाणीपुरवठा होत आहे. माळशिरस तालुक्यातील बचेरी, लोणंद, शिगोर्णी, लोंढे-मोहितेवाडी, निटवेवाडी, शिवारवस्ती, मगरवाडी, भांब, सुळेवाडी, गारवाड आदी भागात पाण्याचे टँकर सुरू आहेत. मंगळवेढा तालुक्यातील येड्राव, दक्षिण सोलापूर तालुक्यातील दोड्डी येथे प्रत्येक एक टँकर, अक्कलकोट तालुक्यातील सुलेरजवळगे, वसंतराव नाईक नगर येथे तीन टँकरने पाणीपुरवठा होत आहे.
जिल्ह्यातील 16 गावांमध्ये 17 पाण्याचे टँकर सुरू आहेत. या टँकरद्वारे 30 हजार नागरिकांबरोबरच 40 हजार पशुधनास टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. उन्हाची तीव्रता वाढत असल्याने येत्या काही दिवसात वाड्या-वस्त्यांवर टँकरची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या उजनी धरणाचा पाणीसाठा वजा 18 टक्क्यांवर आला आहे. यंदाच्या वर्षी धरणात 122 टीएमसी पाणीसाठा होता. मात्र, आता धरण वजा पातळीत आले आहे. धरणातून सध्या कालव्याच्या माध्यमातून शेतीसाठी 2209 क्युसेकने पाणी सोडले जात आहे. याशिवाय बोगद्याच्या माध्यमातून 350 क्युसेकने पाणी सोडले जात आहे.
उजनी धरणातून सीना नदीमध्य पाणी सोडावे या मागणीसाठी उत्तर सोलापूर व मोहोळ तालुक्यातील शेतकर्यांनी सिंचन भवनसमोर ठिय्या आंदोलन केले आहे. जसजशी उन्हाची तीव्रता वाढत आहे, तसतसा पाण्यासाठी शेतकर्यांचा संघर्ष सुरू असल्याचे जाणवू लागले आहे.