मोहोळ (सोलापूर) : पुढारी वृत्तसेवा : mp chhatrapati sambhaji raje : गरीब मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने आपापली भूमिका पार पाडावी. यापूर्वी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर ५८ मराठा मोर्चे निघून देखील त्याचा काहीही उपयोग झाला नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात मराठा समाजाला न्याय न मिळाल्यास लॉंग मार्च काढण्यात येईल असा इशारा भाजपचे खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी दिला.
बुधवार २७ ऑक्टोंबर रोजी मोहोळ येथे सकल मराठा समाजाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जनसंवाद मेळाव्याप्रसंगी ते बोलत होते. खा. संभाजीराजे यांचे मोहोळ शहरात आगमन झाल्यानंतर शिवाजी चौकात त्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी मोटर सायकल रॅलीचे नियोजन असताना देखील संभाजीराजे यांनी सभागृहा पर्यंतचे दोन किमी अंतर चालत जाऊन लॉंग मार्च रंगीत तालीम केली. याचा उल्लेख त्यांनी आपल्या भाषणात देखील केला.
याप्रसंगी मंचावर सकल मराठा समाजाचे रायगड समन्वयक अंकुश जाधव, राजेंद्र कोंढरे, गंगाधर काळकुटे, प्रकाश देशमुख, धनंजय जाधव, राजन जाधव, माऊली पवार, दत्ता मुळे, डॉ. स्मिता पाटील, शुभांगी लुंबे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते. पुढे बोलताना खासदार संभाजीराजे म्हणाले की, लॉंग मार्चची रंगीत तालीम आज आपण पाहिली आहे. प्रत्येकी ३५ किमी अंतराचे टप्पे करून आपण मुंबई गाठायची आहे. ज्या ठिकाणी मुक्काम होईल त्या ठिकाणी मी देखील राहणार आहे. छत्रपती सुद्धा रयतेच्या जवळ राहू शकतात हे आपण राज्यकर्त्यांना दाखवून देऊ.