मोडनिंब : शनिवारी ४ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री मोडनिंब परिसरातील अरण, भेंड व पडसाळी सोलंकरवाडी या गावांमध्ये झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे सगळीकडे पाणीच पाणी झाले.
येवती तलावास जाणाऱ्या मोडनिंब मधील वेताळबाबा देवस्थान जवळील ओढ्याला खुप मोठ्या प्रमाणात पाणी आले. त्यामुळे ०५ ऑक्टोबर रविवारी रोजी ओढ्यावरील वाहतूक बंद झाली होती. तरीही यामधून नागरिक ये-जा करत होते यामध्ये आजारी चार महिन्याच्या लहान बालकाला दवाखान्यामध्ये घेऊन वृद्ध दांपत्य मोडनिंब कडे येत असताना ओढ्याच्या मधोमध आल्यानंतर पाण्याचा प्रवाह जादा असल्याने मोटारसायकल बंद पडली पाण्याच्या प्रवाहामध्ये ते वाहून जाऊ लागले असता ओढ्याच्या कडेला असलेल्या युवकांनी त्यांना मोठ्या धाडसाने वाचवले आणि चार महिन्याच्या लहान व वृद्ध दांपत्यांना पाण्याच्या बाहेर काढले.
या ओढ्याची उंची वाढवण्याची मागणी अनेक वर्षांपासून शासनाकडे केलेली असूनही याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसते मागील दोन वर्षापूर्वीही असाच पूर आला होता त्यातही मुले वाहून जाताना त्यांना वाचवण्यात आले होते. हा रस्ता करकंब मोडनिंब असा असून यामध्ये बैरागवाडी, जाधववाडी, ढेकळेवाडी व अनेक खेड्यापाड्यातील लोक या रस्त्याने ये-जा करत असतात. या ओढ्यामध्ये अनेक अशा घटना पावसाळ्यामध्ये घडत आहेत तरी या ओढ्याची उंची वाढवावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. संबंधित विभाग दुर्दैवी घटना घडण्याची वाट पाहत आहे काय? असा सवाल मोडनिंब ग्रामस्थ करत आहेत.