

अक्कलकोट: तालुक्यातील जेऊर गावात रविवारी (दि.२१) सायंकाळी ढगफुटीसदृश पाऊस झाला. ज्यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले. या मुसळधार पावसामुळे ओढ्यांना पूर आला आणि पाण्याचे लोंढे थेट गावात शिरले. गावातील वेशीपर्यंत गुडघाभर पाणी साचले होते, तर धनगर गल्लीतील अनेक घरांमध्ये पाणी घुसल्याने लोकांची तारांबळ उडाली. या परिस्थितीमुळे नागरिकांना तात्पुरता निवारा म्हणून काशिविश्वेश्वर मंदिरात आश्रय घ्यावा लागला.
गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतातील बांध फुटून पाणी शेजारील शेतात आणि उभ्या पिकांमध्ये साचले आहे. तसेच, फरशी ओढ्यावरून पाणी वाहत असल्यामुळे जेऊर ते अक्कलकोट आणि जेऊर ते अक्कलकोट स्टेशनकडे जाणारे दोन्ही रस्ते बंद झाले आहेत, ज्यामुळे वाहतूक पूर्णपणे थांबली आहे.
या जोरदार पावसामुळे परिसरातील ओढे आणि नाले तुडुंब भरून वाहत आहेत. यामुळे केळी, ऊस, तूर, सोयाबीन आणि सूर्यफूल यांसारख्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे, ज्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.